अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा ‘प्रवास’ जिथं प्रवास असतो, तिथं प्रवासी आलेच...

अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा 'प्रवास'


जिथं प्रवास असतो, तिथं प्रवासी आलेच...


आयुष्याचा प्रवास शेकडो क्षणांनी भरलेला, पुढे काय होणार? हे सांगता न येणारा,  क्षणोक्षणी शिकवण देणारा, हा प्रवास कुठल्यातरी कारणासाठी खूप महत्वाचा होऊन जातो आणि कायमचा लक्षात राहतो. अशाच एका सुंदर प्रवासाची गोष्ट सांगणाऱ्या 'प्रवास' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व चतुरस्त्र अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हे या प्रवासातले प्रवासी आहेत.


 


'जे शेष आहे ते विशेष आहे' असं आयुष्याचे मर्म सांगणाऱ्या या टीझरमध्ये अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या नात्यातले सुंदर क्षण पहायला मिळत आहे. या सहप्रवासाची ही गोष्ट ३१ जानेवारीला चित्रपटगृहात अनुभवता येणार आहे. अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर हे या प्रवासातले सहप्रवासी आहेत.


 


ओम छंगानी फिल्म्स निर्मित 'प्रवास' या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सलीम सुलेमान यांचा मराठी चित्रपटसृष्टीतला संगीत दिग्दर्शक म्हणून 'प्रवास' या निमित्ताने सुरु झाला आहे. गीतलेखन गुरु ठाकूर यांचे आहे. कलादिग्दर्शक महेश साळगांवकर तर संकलन संजय सांकला यांचे आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. रंगभूषा श्रीकांत देसाई तर वेशभूषा ताशीन अन्वारी, दिप्ती सुतार यांची आहे.