डॉ. भा. ल.भोळे -डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्काराचे वितरण* वैचारिकता जोपासणारे वातावरण निर्माण व्हावे : डॉ. सदानंद मोरे

Press release


 *'डॉ. भा. ल.भोळे -डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्काराचे वितरण*


वैचारिकता जोपासणारे वातावरण निर्माण व्हावे : डॉ. सदानंद मोरे


पुणे:


  यशवंतराव दाते स्मृती संस्था(वर्धा) यांच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल.भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा वितरण सोहळा   
डॉ. भा. ल . भोळे यांच्या स्मृतिदिनी , २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पुणे येथे म. सा. प. चे  माधवराव पटवर्धन सभागृहात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष  ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या  हस्ते  पार पडला.  


      वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल.भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर ) , ब्रायन लोबो ( पालघर ) व डॉ . अभय दातार ( नांदेड ) यांना गौरविण्यात आले.  जीवनगौरव पुरस्काराने  ज्येष्ठ  राजकीय विश्लेषक डॉ.अशोक चौसाळकर यांना गौरविण्यात आले.


 निवड समितीचे प्रमुख निमंत्रक  किशोर बेडकिहाळ ,दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी स्वागत केले.


    डॉ.भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार प्रत्येकी वीस हजार व डॉ.यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार प्रत्येकी दहा हजार रुपये रोख , स्मृतिचिन्ह व मानपत्र असे  या पुरस्काराचे स्वरूप आहे. 


      डॉ. यशवंत सुमंत कुटुंबियांच्या वतीने या वर्षापासून ज्येष्ठ अभ्यासकासाठी जीवनगौरव पुरस्कार सुरु केला आहे. या पहिल्या पुरस्काराने  वैचारिक  क्षेत्रात मौलिक योगदान देणारे अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर यांना गौरविण्यात आले .  भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी 'सत्यशोधकीय नियतकालिके ' ग्रंथाचे लेखक कोल्हापूरचे डॉ. अरुण शिंदे यांना गौरविण्यात आले. डॉ .भा.ल .भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी आदिवासी क्षेत्रात काम करणारे पालघरचे ब्रायन लोबो यांना तर डॉ . यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कारासाठी तरुण अभ्यासक नांदेड येथील पीपल्स  कॉलेजचे प्राध्यापक डॉ . अभय दातार यां ना गौरविण्यात आले.


' पत्रकारितेमध्ये सामान्य माणूस केंद्र स्थानी आणायचा असेल तर दलीत पत्रकारिता, सत्यशोधक आणि प्रबोधन पत्रकारिता कडून प्रेरणा घेतली पाहिजे', असे मनोगत डॉ. अरुण शिंदे यांनी व्यक्त केले.


डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले,' आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाची जाण सर्वांना असायला हवी, असे डॉ. भोळे आणि डॉ सुमंत यांना वाटत असे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मिळणारा पुरस्कार स्वीकारताना मी भारावून गेलो आहे. प्रकाशकांचा , वाचकांचा प्रतिसाद नसल्याने वैचारिक ग्रंथ प्रकाशित होत नाहीत. ते झाले पाहिजेत. सद्यस्थितीत उपस्थित प्रश्नाबाबत स्पष्ट मते मांडली पाहिजेत, कारण प्रश्नांना भिडणे हीच सुमंत, भोळे यांची शिकवण होती.


प्रा. मिलिंद जोशी म्हणाले,' एकारलेपणाची मानसिकतेने समाजाचे , चळवळीचे नुकसान होते. म्हणून आपला दृष्टीकोण व्यापक केला पाहिजे. सत्याचा शोध घेणे हेच  लेखनाचे अंतिम उद्दीष्ट असले पाहिजे. तसे निकोप वातावरण आहे का, याचा विचार केला पाहिजे.


डॉ सदानंद मोरे म्हणाले,' वैचारिकता जतन केली पाहिजे. विचार मांडणाऱ्या वरच ती जबाबदारी टाकणे योग्य नाही. भोळे, सुमंत यांची महाराष्ट्राची वैचारिकता घडविण्यात मोठा वाटा होता. समाजात वैचारिकता जोपासणारे वातावरण निर्माण केले पाहिजे. ही वैचारिकता जपायला आपण कमी पडतो, आपली दानत कमी पडते. तरुण अभ्यासकांना प्रोत्साहित केले पाहिजे. हल्ली पुरस्कार प्रक्रियेचे यांत्रिकिकरण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार उठून दिसतो.


सर्व प्रकारची मैत्री समाजात होत असताना  वैचारिक मैत्री दुर्मिळ होत आहे. वैचारिक परिवार वाढला पाहिजे ,वर्धिष्णू व्हावेत.व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न महत्वाचे आहेत, आणि आहे त्या व्यवस्थेतून लोकांचे हक्क मिळवून देणे हे कार्यकर्ताचे काम  महत्वाचे आहे, असेही डॉ मोरे म्हणाले.


उध्दव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.



................................
*फोटो ओळ*: यशवंतराव दाते स्मृती संस्थे तर्फे डॉ भा. ल .भोळे, डॉ यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात डावीकडून अभय दातार, ब्रायन लोबो, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ.अरूण शिंदे, डॉ. सदानंद मोरे, प्रा. मिलिंद जोशी, प्रदीप दाते, किशोर बेडकिहाळ
        


................................................