सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने                            जबाबदारी पार पाडावी

सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने 
                          जबाबदारी पार पाडावी
              विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे, दि. 23 -   पुणे जिल्हयामधील हवेली तालुक्यामध्ये पेरणेफाटा ( कोरेगाव भिमा) येथे 1 जानेवारी रोजी होणा-या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास मोठया संख्येने नागरीक उपस्थित असतात. हा अभिवादन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच जबाबदार यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना  विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
          दिनांक 1 जानेवारी  रोजी होणा-या या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा आज डॉ.दीपक म्हैसेकर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी भेट देवून घेतला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधिक्षक जयंत मिना, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसिलदार एल.डी.शेख, सुनिल कोळी, तसेच पोलीस, महसूल व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थिशत होते.
          श्री.म्हैसेकर म्हणाले की, मागील वर्षीच्या नियोजनामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करुन प्रशासकीय यंत्रणांनी कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत सतर्क राहावे. येणा-या नागरीकांकरीता जास्तीत जास्त सोई-सुविधा पुरविण्यात याव्यात. आवश्यकतेनुसार इतर यंत्रणांचीदेखील मदत घेण्यात यावी. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महावितरण विभागामार्फत करण्यात येणा-या पथदिवे, हायमास्ट दिवे, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणा-या रस्ते दुरुस्ती, वाहनतळ उभारणी, सीसी कॅमेरा,ड्रोनद्वारे निरीक्षण, पीएमपीएल तसेच एस.टी.महामंडळाकडून पुरविण्यात येणा-या बसेस, आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येणा-या रुग्णवाहीका, हॉस्पिटलमधील राखीव खाटा, महिलांकरीता पुरेशा स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचे टँकर, अग्नीशमन यंत्रणा, नियंत्रण व स्वागत कक्ष इत्यादीबाबत माहिती सादर केली.
      या बैठकीनंतर विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर यांनी वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे व आसपासच्या परिसराची तसेच तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती स्थळाची पाहणी केली. व उपस्थित अधिका-यांना सूचना केल्या.
    या आढावा बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी भिमा कोरेगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी श्री.राम यांनी मागील वर्षी या परिसरातील ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळेच अभिवादन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याचे सांगून यावर्षी देखील त्याचप्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच ग्रामस्थांनी  मागणी केलेल्या यात्रा अनुदान, रस्ते व गटारे याकरीता जिल्हा नियोजन समिती कडून अनुदान मिळणेबाबत तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नवीन पाणीपुरवठा योजना मंजुर करावी, अशा प्रकारच्या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचीत करण्यात येईल, असे सांगितले.  पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेचे तसेच हा अभिवादन सोहळा सुरळीतपणे पार पडण्याकरीता पोलीस विभाग सज्ज असल्याचे सांगितले. याबैठकीला परिसरातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व  ग्रामस्थ उपस्थित होते. 
0 0 0 0 0