पोक्सो" ही बालकांचे संरक्षण करणारी मजबूत कायदेशीर चौकट - डॉ. निपुण विनायक

"पोक्सो" ही बालकांचे संरक्षण करणारी मजबूत कायदेशीर चौकट
- डॉ. निपुण विनायक
पुणे दि 26 :- बालक संरक्षण धोरणानुसार मुलांच्या हिताचे संरक्षण करुन विविध गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट पुरविण्याकरिता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण हा कायदा (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सशुअल ॲक्ट पोक्सो) प्रभावी आणि परिणामकारक असल्याचे प्रतिपादन नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे नवनियुक्त आयुक्त तथा संचालक डॉ. निपुण विनायक यांनी आज केले. 
विभागीय आयुक्त कार्यालय येथे पुणे विभागातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. विनायक बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नगर प्रशासन विभागाचे उपसंचालक प्रशांत खांडकेकर, पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. 
पुणे विभागातील पोक्सो कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत आढावा बैठक घेऊन या कायद्याची परिणामकारकता, व्याप्ती व स्वरुप या बाबत सादरीकरण  करण्यात आले. पोक्सो कायद्याविषयी समाजात जागरुकता वाढण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. विनायक यांनी सांगितले. 
जैव विविधता कायद्याबाबत पुणे विभागांतर्गत जिल्हानिहाय आढावा घेवून जैव विविधता समिती स्थापन करणे तसेच लोक जैवविविधता नोंद वह्या अद्ययावत ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विभागातील जिल्हानिहाय प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ सर्वेक्षण याबाबत आढावा घेऊन डॉ. विनायक यांनी मार्गदर्शन केले. 
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र मिशन अशा विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच विभागात राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांबाबत डॉ. विनायक यांना माहिती दिली.
यावेळी विभागातील मुख्याधिकाऱ्यांनी आपआपल्या नगरपरिषदा व नगरपंचायती अंर्तगत राबविण्यात येणार असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती बैठकीत सादर केली. 
******