मुंबईतील ( साकिनाका ) आगीत दोघांचा मृत्यू; एक बेपत्ता

मुंबईतील ( साकिनाका ) आगीत दोघांचा मृत्यू; एक बेपत्ता
___________________________________


मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे शुक्रवारी लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश असून त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. ही आगआटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.शुक्रवारी संध्याकाळी साकीनाका येथील खैरानी रोडवरील दोन गाळ्यांना आग लागली. दरम्यान, या ठिकाणी लाकडांची आणि रसायनांची गोदामं असल्यानं आग मोठ्या प्रमाणात पसरली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमनदलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. परंतु दाटीवाटीच्या भागामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येत होत्या.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरातील वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला होता. या घटनेत ३० ते ३५ गाळे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण अद्यापही बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे.