बंधुतेच्या अभावामुळेच देशात अस्थिरतेचे वातावरण


 


*बंधुतेच्या अभावामुळेच देशात अस्थिरतेचे वातावरण*


- डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात व्याख्यान


भोसरी (पुणे) : "सर्व संतांनी, महापुरुषांनी बंधुतेचे मूल्य आपल्या साहित्यातून व कृतीतून मांडले आहे. धर्मग्रंथानीही बंधुतेला प्राधान्य दिल्याचे दिसते. मात्र, राजकीय आकांक्षेपोटी आणि स्वार्थी भावनेने अनुयायांनी महापुरुषांना जातीधर्माच्या बंदिस्त करून बंधुतेचा गळा घोटण्याचे काम केले आहे. स्वातंत्र्य, समतेवर आपण बोलतो. मात्र, त्याचा मूळ गाभा असलेल्या बंधुतेला आपण बाजूला केले आहे. आज समाजात बंधुतेचा अभाव आहे आणि बंधुतेच्या या अभावामुळेच देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितून बाहेर पडून देशाला एकसंध ठेवायचे असेल, तर आपण प्रत्येकाने बंधुभाव जोपासण्याची गरज आहे," असे स्पष्ट प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.


राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या संयुक्तपणे भोसरी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात आयोजिलेल्या एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रकाश पगारिया व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, नवी दिल्ली येथील ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष पारस मोदी, संघटक डॉ. विजय ताम्हाणे, संयोजक प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, सहसंयोजक महेंद्र भारती, प्राचार्य रामचंद्र जगताप, कवी चंद्रकांत वानखेडे, संगीता झिंजुरके, पत्रकार शिवाजीराव शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.


तत्पूर्वी राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा काढण्यात आली. यामध्ये साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'बंधुतेच्या विचारधारा' या अध्यक्षयीय भाषण पुस्तकाचे, 'मूल्यवैभव' संमेलन स्मरणिकेचे. 'पवनेचा प्रवाह' संमेलन विशेषांकाचे, तर डॉ. अशोक शिंदे लिखित 'अक्षरसाधना' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर कवी चंद्रकांत वानखेडे यांचा 'जाऊ कवितेच्या गावा' हा कर्यक्रम सादर झाला. प्रसंगी भोसरी येथील टागोर शिक्षण संस्थेच्या टागोर माध्यमिक विद्यालयाला 'श्यामची आई पुरस्कार' देण्यात आला.रमेश पाचंगे यांच्या चौघडा वादनाने उपस्थितांची मने जिंकली. 


डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, "भारताच्या लोकशाहीचा ग्रंथ संविधान असून, त्याचा गाभा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या सुत्रावर आधारीत आहे. मात्र, या मूल्यात्मक सूत्रांना आपण समान पातळीवर स्वीकारलेले नाही. बंधुतेचे मूल्य बाजूला पडले आहे. राजकारणी, साहित्यिक किंवा सामाजिक कार्यकर्ते कोणीही बंधुतेला प्राधान्य देत नाही. खरेतर बंधुता हे या सगळ्यांच्या मुळाशी असून, समाजातील व देशातील सर्व प्रश्नांवरचे उत्तर आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणूसपणाची संवादी भूमिका असलेल्या बंधुतेच्या सिद्धांताला कृतिशीलतेची जोड देण्याची आवश्यकता आहे. बंधुतेचे मूल्य राष्ट्रीय पातळीवर रुजविण्याची गरज असून, आपण प्रत्येकाने बंधुतेच्या मूल्याचा स्वीकार केला पाहिजे."


डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, "बंधुतेचा विचार निसर्गामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. सारा निसर्ग बंधुतेच्या तत्वावर उभा आहे. मात्र, माणुसकीचा माणसाला विसर पडल्याने बंधुतेचा अस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळते. समानतेच्या, बंधुतेच्या विचारांमध्ये असलेला विरोध दूर करण्याची जबाबदारी धर्मगुरुंवर आहे. सर्व धर्मग्रंथात मर्यादा असल्या, तरी त्यात कालानुरूप बदल केला पाहिजे. कारण समाजातील कटुता घालावयाची असेल, तर माणसामाणसांमध्ये बंधुतेची भावना भिनायाला हवी. बंधुत्व म्हणजे किती व्यापक आणि उदात्त कल्पना आहे, हे आपण समजून घ्यायला हवे. साहित्य आणि समाजाचा एकमेकांवर प्रभाव असतो. साहित्यातून समाजजीवनाचे, वर्तमान स्थितीचे प्रतिबिंब पडत असते. त्यामुळे समाजाचा आरसा बनून साहित्याने बंधुता रुजविण्याचे काम करावे."


पारस मोदी म्हणाले, "समाजामध्ये चांगले विचार रूजण्यासाठी बंधुतेचे हे साहित्य संमेलन गरजेचे आहे. अशा संमेलनातुन अनेक नवीन विचार समाजाला मिळतात. बंधुता जाती-धर्म-पंथ विसरून सर्वाना एकत्र आणते, हे सुखावह आहे." स्वागतपर भाषणात कृष्णकुमार गोयल म्हणाले, "संत-महात्म्यांनी, आपापल्या कालखंडात मांडलेले बंधुतेचे तत्वज्ञान भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे नेले आणि ते जगाने स्वीकारलेही. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आपणही कृतिशील होण्याची गरज आहे. त्यासाठी बंधुतेची अभाव आणि प्रभावरूपे समजून घ्यायला हवीत."


बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले. डॉ. अशोक शिंदे यांनी आभार मानले.
------------------------
फोटो ओळी
४९२८ : डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना डॉ. अशोककुमार पगारिया. प्रसंगी डावीकडून डॉ. विजय ताम्हाणे, प्रकाश रोकडे, कृष्णकुमार गोयल, डॉ. पगारिया, डॉ. सबनीस व पारस मोदी.
४९४६ : बंधुतेची ज्योत प्रज्वलित करून संमेलनाचे उद्घाटन करताना मान्यवर. डावीकडून डॉ. अशोक शिंदे, डॉ. विजय ताम्हाणे, कृष्णकुमार गोयल, डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. श्रीपाल सबनीस, प्रकाश रोकडे व पारस मोदी.
४९५५ : 'बंधुतेच्या विचारधारा' पुस्तक प्रकाशनावेळी डावीकडून डॉ. अशोक शिंदे, डॉ. विजय ताम्हाणे, कृष्णकुमार गोयल, डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. श्रीपाल सबनीस, प्रकाश रोकडे व पारस मोदी.