*जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी 'संकल्प' प्रकल्प प्रभावीपणे राबविणा*
*-जिल्हाधिकारी नवल किशोर राम*
पुणे-२७:- केंद्र सरकारच्या 'संकल्प' या प्रकल्पाच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळवून देणे शक्य होणार असून हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास समितीने प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी केल्या.
संकल्प प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अपर सचिव ज्युथिका पाटणकर, कौशल्य विकास, उद्योजकता संचालनालयाचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, कौशल्य विकास विभागाचे उपसंचालक शरद आंगणे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. संकल्प प्रकल्पाअंतर्गत विविध विभागांमार्फत, संस्थामार्फत राबविण्यात येणा-या योजना, जिल्ह्यात उपलब्ध पायाभूत सुविधा तसेच उपलब्ध होवू शकणा-या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी यांचा विचार करून पुणे जिल्हयाचा सन 2020-21 साठीचा कौशल्य विकास आराखडा तयार करण्यात येत असून या आराखड्याच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण पध्दतीने कौशल्य विकास साधणे शक्य होईल.
*'संकल्प' प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास समितीने प्रभावीपणे काम करावे*
ज्युथिका पाटणकर
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अपर सचिव ज्युथिका पाटणकर म्हणाल्या, विविध उद्योगधंदे तसेच कंपन्यांमध्ये असणाऱ्या रिक्त जागा व या जागांसाठी आवश्यक असणारी पात्रता ही माहिती उद्योजकांनी जिल्हा कौशल्य विकास समितीला दिल्यास त्यानुसार 'संकल्प' प्रकल्पाद्वारे तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. त्याचबरोबर आवश्यक पात्रता पूर्ण असणारे कुशल मनुष्यबळ कंपन्यांना पुरविणे सोपे जाईल. त्यायोगे गरजू आणि पात्र तरुणांना रोजगार मिळेल. पुण्यात अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. जिल्हा समितीने कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाबाबतची माहिती अद्ययावत करुन त्यानुसार कंपनीला मनुष्यबळ पुरविल्यास जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळवून देणे शक्य होईल. पुणे जिल्हा समितीच्या वतीने या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास त्यानुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील.
दिपेंद्र सिंह कुशवाह म्हणाले, विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण तरुणांना देवून अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळवून देणे, हा कौशल्य विकास विभागाचा मुख्य हेतु आहे. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक कंपनीत असणारी रिक्त पदे व त्यांना आवश्यक असणारे कौशल्य विषयक प्रशिक्षण याबाबतची माहिती उद्योगांनी जिल्हा समितीला पुरवावी. जिल्हा समितीने आवश्यक पात्रता असल्याची खात्री करुन त्यानुसार उद्योगांना मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. यात जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.
रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहायक संचालक अनुपमा पवार म्हणाल्या, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने नॅशनल स्कील डेव्हलपमेंट मिशन अंतर्गत स्कील्स ॲक्वीजीशन ॲण्ड नॉलेज अवेरनेस फॉर लाईव्हलीहूड प्रमोशन (संकल्प) हा प्रोजेक्ट 15 जुलै 2019 रोजी सुरू करण्यात आला आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली असून यात पुणे जिल्ह्याचा समावेश आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, उद्योजकांनी वेळोवेळी रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार आवश्यक असणाऱ्या पात्रतेबाबतची माहिती जिल्हा समितीला कळविल्यास त्यानुसार मनुष्यबळ पुरविता येईल. तसेच ही यादी अद्ययावत ठेवणे शक्य होईल.
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे विक्रांत चावला यांनी 'संकल्प' प्रकल्प राबविण्याबाबत सादरीकरणातून सविस्तर माहिती दिली. रिक्त पद भरती, प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम, समुपदेशन, प्रशिक्षणाचा दर्जा, स्वयंरोजगार निर्मिती, शासनाच्या वतीने देण्यात येणारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम याबाबत त्यांनी माहिती दिली.
प्रशासन आणि उद्योजक यामध्ये समन्वय राहण्यासाठी किमान तीन महिन्यातून बैठक आयोजित करण्यात यावी, जेणेकरुन उद्योगधंदे, रिक्तपदे, आवश्यक पात्र मनुष्यबळ आदीबाबत विचारविनिमय करता येईल, कंपन्यांमध्ये तरुणांना शैक्षणिक पात्रतेनुसार काम द्यावे, जेणेकरुन तरुणांनी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण कमी होईल अशा विविध सूचना यावेळी पुण्यातील विविध इंडस्ट्री असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच प्रख्यात उद्योजक तसेच उपस्थित मान्यवरांनी केल्या.
00000000