सार्वजनिक जीवनात आणि त्यातून निवडणुकीला सामोरे जाताना आमच्यावर एक जबाबदारी असते ती म्हणजे, माणसं सांभाळण्याची...शरद पवार

सार्वजनिक जीवनात आणि त्यातून निवडणुकीला सामोरे जाताना आमच्यावर एक जबाबदारी असते ती म्हणजे, माणसं सांभाळण्याची आणि ही जबाबदारी पार पाडताना अनेक समारंभाला जावं लागतं. अनेकांचं कौतुक करावं लागतं. मात्र, आज शिक्षणमहर्षी श्री. अंकुशराव उर्फ बाबुराव कदम यांचा अमृत महोत्सव सोहळ्याचे आमंत्रण आल्यानंतर मी पटकन येण्यास हो म्हणाले. ज्या लोकांनी सबंध जीवनामध्ये निर्मितीचा आनंद घेण्यासाठी उभं आयुष्य दिलं. तसेच व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनामध्ये निर्मिती करण्याची खबरदारी अखंडपणे घेतली. अशा व्यक्तींमध्ये त्यांचा उल्लेख करावा लागेल. 
कमलबाबू यांची दृष्टी, बाबुराव यांचं प्रशासन आणि अनेकांचे सहकार्याचे हात असल्यामुळे ही संस्था उभी राहू शकली. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची आग्रही भूमिका अनेकांनी घेतली. मात्र त्याला गुणवत्तेचा देखील आधार असण्याची आवश्यकता असते. अशी गुणवत्ता अनेक ठिकाणी पाहायला मिळतेच असं नाही. आज अनेक ठिकाणी प्रपंच चालवण्यासाठी शाळा चालवल्या जातात. यावरून काही ठिकाणी उत्पन्नाचं साधन म्हणून शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बनत चालला आहे, ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. 
शिक्षण, सेवा आणि संशोधन या मूल्यांची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचं काम इथे अखंडपणे होत आहे. त्यामुळे एमजीएमबद्दल कधीही चुकीचं ऐकायला येत नाही. मराठवाड्यामध्ये शिक्षणाचा प्रसार होण्यासंबधी आम्हीसुद्धा अनेक प्रयत्न केले. त्या प्रयत्नांत एमजीएमचा हातभार मोठा आहे. विशेषत: यात सामाजिक जाणीवेतून उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या मराठवाड्यातील मुलींना सुविधा व सवलती दणारे काम इथे होतं. याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!