कल्पनेला पडद्यावर साकारणारे ‘इल्युजन इथेरिअल’ - पंकज सोनवणे, विवेक जांबळे, भूषण हुंबे आणि रणजीत गुगळे हे मराठी युवक गाजवत आहेत हॉलीवूड - बॉलीवूड


कल्पनेला पडद्यावर साकारणारे 'इल्युजन   इथेरिअल'  


 


-    पंकज सोनवणे, विवेक जांबळे, भूषण हुंबे आणि रणजीत गुगळे हे मराठी युवक  गाजवत आहेत हॉलीवूड - बॉलीवूड 


 


चित्रपटाच्या कथेची मांडणी, सादरीकरण याला जेवढे महत्व आहे, तेवढेच महत्व आज व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्ट्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाला सुद्धा चित्रपट निर्माते, दिग्दर्शक देत असल्याचे दिसते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'लाल कप्तान', 'हिरकणी, 'फत्तेशिकस्त' या हिंदी, मराठी चित्रपटांच्या व्हीएफएक्सची मोठी चर्चा सर्वत्र होती. या तीनही चित्रपटाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ 'इल्युजन  इथेरिअल स्टुडीओ एलएलपी'च्या माध्यमातून पुण्यातील चार तरुणांनी केली आहे. इल्युजन इथेरिअलने मराठी, हिंदीसह युरोपियन आणि हॉलीवूडपटावरही आपली छाप उमटविली आहे.


पंकज सोनवणे, विवेक जांबळे, भूषण हुंबे आणि रणजीत गुगळे यांनी २००८ साली  'इल्युजन  इथेरिअल स्टुडीओ एलएलपी' ची मुहूर्तमेढ रोवली. ही सर्जनशील टीम चित्रपट, दूरचित्रवाहिनी, अॅनिमेशन फिल्म अशा बहुविध क्षेत्रात कार्यरत आहे. कोणतीही कथा ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक कल्पकतेने सादर करण्याचे कौशल्य या टीमकडे असल्याचे त्यांनी केलेल्या कलाकृतीच्या माध्यमातून दिसते.


या मराठमोळ्या तरुणांनी आपल्या कामाची सुरुवात 'मल्टीपल मीन्स ऑफ मर्डर' या युरोपियन चित्रपटापासून केली. त्यापुढे जात 'गार्डियन ऑफ द गलेक्सी', 'डेडपूल' अशा बिगबजेट हॉलिवूडपटासाठी काम केले आहे. त्यांनी आपल्या कामातून बॉलीवूडमध्येही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सैफ अली खानचा बहुचर्चित 'लाल कप्तान', अनुराग कश्यपचा 'मनमर्जीया', 'मुक्काबाज', 'सोनू के टीटू की स्वीटी', 'करीब करीब सिंगल', 'साहिब बीबी और गँगस्टर ३', नेटफ़्लिक्सवर प्रदर्शित 'लस्ट स्टोरीज' आदी हिंदी चित्रपटासाठी त्यांनी काम केले आहे. इथेरिअल स्टुडीओने मराठी मध्ये 'हिरकणी', 'फत्तेशिकस्त' या चित्रपटापूर्वी 'फँड्री', 'शाळा', 'रेगे', 'वाय झेड', 'हायवे',  मुरांबा', 'जाऊंद्याना बाळासाहेब', 'फास्टर फेणे', 'तेंडल्या', 'गर्लफ्रेंड', 'धप्पा' 'आजोबा', 'डबल सीट' अशा अनेक चित्रपटांसह आगामी 'धुरळा' आणि  'वसंतराव' या चित्रपटाच्या स्पेशल इफेक्ट्स आणि व्हीएफएक्ससाठी काम केले आहे.


छोट्या पडद्यावरही इथेरिअल स्टुडीओने उत्तम कामगिरी केली असून निक वाहिनीवर 'मोटू पतलू' आणि हंगामावर 'वीर – द रोबो बॉय' या अॅनिमेशन सिरीजसाठी ते काम करतात. तर वेब सिरीजच्या दुनियेतही त्यांनी काम केले आहे. याशिवाय अनेक बहुराष्ट्रीय उत्पादनांच्या जाहिराती आणि बड्या कॉर्पोरेट फिल्म मधून त्यांनी आपल्या कल्पकतेने करामत दाखविली आहे.