लक्ष्मी डेबरे यांची माणुसकी प्रेरणादायी : प्रा. ज्योत्स्ना एकबोटे  अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलेचा सत्कार 

 








लक्ष्मी डेबरे यांची माणुसकी प्रेरणादायी : प्रा. ज्योत्स्ना एकबोटे 

अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलेचा सत्कार








 

पुणे : विश्रांतवाडीतील एकतानगरमधील कचरा कुंडीत टाकलेल्या नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला जीवदान देणाऱ्या कचरावेचक महिला लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव यांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचाही देखील सत्कार करण्यात आला.

 

कपड्यात गुंडाळून गळ्याला फास लावून कचऱ्यात टाकलेल्या एक दिवसाच्या अर्भकाला वाचवणाऱ्या लक्ष्मी डेबरे व सहकाऱ्यांचा सत्कार महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या पुढाकारातुन महिला बालकल्याण समितीच्या वतीने सहकारी नगरसेविका नीता दांगट, मनीषा लडकत, स्वप्नाली सायकर, सुजाता शेट्टी व शीतल सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, समाज विकास विभाग उपायुक्त सुनील इंदलकर, नगरसचिव सुनील पारखी, उपनगरसचिव राजेंद्र शेवाळे, सामान्य प्रशासन उपायुक्त अनिल मुळे, माध्यमिक विभाग शिक्षाधिकारी दिपक माळी, समाज कल्याण उपअधिक्षक संजय रांजणे, उज्वला ठाणगे यांच्या सह महापालिकेतील अनेक अधिकारी यावेळी  उपस्थित होते. याप्रसंगी लक्ष्मी डेबरे, मंगल जाधव यांच्यासह आरोग्य निरीक्षक सुनील डमाळे, सहा आरोग्य निरीक्षक अमोल मस्के, संदीप पवार, मुकादम सुरेखा वाघमोडे, सचिन सकट यांचा सत्कार करण्यात आला. 

 

प्रा. ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, "शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचे मनही निर्मळ आणि मोठे आहे हे या घटनेवरून दिसले. माणुसकीला जीवंत ठेवत सर्वांना अभिमान वाटावा असे काम लक्ष्मीबाईंनी केले आहे. अवघ्या एक दिवसाच्या अर्भकाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढत जीवनदान दिले आहे. लक्ष्मी ताईंमुळे त्या बाळाला नवे जीवन मिळाले असून अशी घटना भावनिक मने जिवंत असल्याचे दाखवून देते.''

 

लक्ष्मी डेबरे म्हणाल्या, "कचरा समजून बोचके बाजूला टाकले मात्र त्यात हालचाल होत असल्याने संशय आला म्हणून उघडून बघितले तर आतील दृश्य पाहून डोळ्यात पाणी तरळले. एक दिवसाच्या अर्भकाला अतिशय वाईट पद्धतीने कापडात गुंडाळून टाकले होते. एका जीवाला वाचवल्याचा समाधान आणि आनंद आहे. कचऱ्या वेचणाऱ्यांना कचऱ्यात दुसरे काही नाही ना याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.''

......

फोटो ओळ :

अर्भकाला वाचविणा-या लक्ष्मी डेबरे यांचा सत्कार करताना महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्यासह इतर मान्यवर.