केन झुकरमन आणि श्रीमती देवी पी.
यांनी रसिकांची मने जिंकली
मेधावी इन्स्टिट्यूट ऑफ म्यूझिकतर्फे आयोजित स्वित्झरलँडचे सरोदवादक केन झुकरमन आणि म्हैसूरच्या शास्त्रीय गायिका श्रीमती देवी पी. यांच्या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. एरंडवणे येथील भारती निवास हॉलमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात म्हैसूरच्या शास्त्रीय गायिका श्रीमती देवी पी यांनी प्रथम राग 'बिहाग'मध्ये बडा खयाल व छोटा खयाल सादर केला. बिहागनंतर राग 'बसंत'मध्ये एक बंदिश आणि तराणा सादर केला. त्यांना उमेश पुरोहित यांनी संवादिनीची तसेच उन्मेश बॅनर्जी यांनी तबलावर साथ केली.
कार्यक्रमाच्या दुसर्या भागात उत्साद अली अकबर खाँ यांचे ज्येष्ठ शिष्य स्वित्झरलँड निवासी केन झुकरमन यांनी सरोदवादन सादर केले. सरोद वादनात प्रथम त्यांनी उस्ताद अली उद्दीन खान यांनी रचलेला राग 'हेम बिहाग' सादर केला. त्यात त्यांनी पारंपारिक पद्धतीने आलप जोड सादर केला. त्यानंतर उस्ताद अली अकबर खान यांनी रचलेल्या राग 'हिं डोल हेम'मध्ये तीन- तालात गती प्रस्तुत केल्या. कार्यक्रमाची सांगता त्यांनी रसिकांच्या फर्मायशीनुसार 'मैहर' घराण्याच्या खास दुर्गेश्वरी या रागाने केली. राग 'दुर्गेश्वरी'मध्ये मध्य लय तीन ताल यांत बंदिश सादर केली. त्यांना तबल्याची साथ उन्मेश बॅनर्जी यांनी केली.
याआधी 'मेधावी' संस्थेने केन झुकरमन यांची मैहर घराण्यातील 'कंठसंगीताच्या बंदिशी' या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांचा व संगीतप्रेमींचा या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला.
केन झुकरमन यांनी या कार्यशाळेत ताल व लयीच्या सरावासाठी उपयोगी असे धडे दिले. राग 'अहिर भैरव', 'अहिरी तोडी' व राग 'मियाँकी-तोडी' यामध्ये त्यांनी उस्ताद अली अकबर खाँसाहेब यांच्याकडून शिकलेले खयाल धु्रपद व तराणे शिकविले. वाद्य संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी खास बंदिशी व विस्तार पध्दती राग भैरवी व राग-भैरवमध्ये शिकविले.
पुण्यातील युवा सरोद वादक अनुपम जोशी हे 'मेधावी' संस्थेचे संचालक आहेत. पुण्यामध्ये वाद्यसंगीताचा प्रचार व प्रसार करण्याचे प्रयत्न 'मेधावी' ही संस्था करते.