मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी ऑनलाईन परतावा प्रणालीचा वापर

मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी ऑनलाईन परतावा प्रणालीचा वापर
पुणे दि.24 :- मुद्रांक परतावा व नोंदणी फी परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी व्हावा, तसेच पारदर्शकता वाढावी या हेतूने नोंदणी व मुद्रांक विभागाने परतावा प्रणाली नव्याने तयार केली आहे. संपूर्ण राज्यात या ऑनलाईन परतावा प्रणालीचा वापर 30 डिसेंबर 2019 पासून सुरू होणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी दिली.
  नोंदणी व मुद्रांक विभागाने मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परतावा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. सदर प्रणाली अर्जदारांकरीता विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदारांनी न्यायीकेत्तर मुद्रांकाचा किंवा दस्त नोंदणीसाठी शासनास भरलेल्या तथापी दस्त नोंदणी न केलेल्या नोंदणी फी चा परतावा मागणीसाठी अर्ज करण्यापूर्वी या प्रकरणालीमध्ये  डाटा एन्ट्री करणे आवश्यक आहे. ही डाटा एन्ट्री  करणे म्हणजे परताव्यासाठी अर्ज करणे असा अर्थ नसून डाटा एन्ट्री  केल्यानंतर, संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित मुद्रांकासह अर्जावर Refund code नमूद करून परताव्यासाठीच्या विहित मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक असल्याचे श्री. कवडे यांनी सांगितले. तसेच या प्रणालीच्या वापरासंदर्भात आवश्यक असलेले प्रशिक्षण संबंधित कर्मचा-यांना देण्यात आले आहे. 
  ऑनलाईन परतावा प्रणालीमुळे परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी होणार असल्याचे सांगून श्री.कवडे म्हणाले, पक्षकाराला परतावा प्रकरण कोणत्या टप्प्यावर आहे किंवा कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहे. हे पोर्टलवर घरबसल्या समजणार आहे. त्यासंदर्भातील एसएमएस  येईल तसेच परतावा आदेश व इतर पत्रव्यवहार डाऊनलोड करता येईल. ऑनलाईन परतावा प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता निर्माण होणार आहे. या प्रणालीच्या वापरामध्ये अडचण असल्यास सारथी हेल्पलाईन क्रमांक 8888007777 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्री. अनिल कवडे यांनी केले आहे.
00000