ख्रिसमस संध्या'तून बाळगोपाळांनी लुटला आनंद

ख्रिसमस संध्या'तून बाळगोपाळांनी लुटला आनंद



पुणे : डोक्यावर लाल टोपी, चेहऱ्यावर निखळ आनंद, उंटावरची सफारी, भरपेट खाऊ, भेटवस्तू देणारा सांताक्लॉज, लक्षवेधक नृत्य सादरीकरण अन खळखळून हसवणारे जादूचे प्रयोग आदी उपक्रमांनी रंगलेल्या 'ख्रिसमस संध्या'तून बालगोपाळांनी मनसोक्त आनंद लुटला.



पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या वतीने दरवर्षी साजरा होणारी 'ख्रिसमस संध्या' यंदा बालगोपाळांबरोबरच त्यांच्या पालकांसाठीही आनंदाची पर्वणी ठरली. सांताक्लॉजच्या हस्ते भेटवस्तू स्वीकारत, खाद्य पदार्थांचा आस्वाद यावेळी बालचमूंनी घेतला. समानतेचा संदेश देताना तिरंगी फुगे आकाशात सोडून वृक्षसंवर्धन, पाणीबचत, कचऱ्याचे व्यवस्थापन, पोलिसांचा आदर, लसीकरण, बेटी बचाव आदी उपक्रमासह स्वावलंबन, समुपदेशन, रोजगारविषयक प्रशिक्षण आदी गोष्टींचा संदेश दिला.



माजी महापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांच्या पुढाकारातून शिवदर्शन येथील कै. वसंतराव बागुल उद्यान आयोजिलेल्या या सर्वधर्मीय नागरिकांनी हजेरी लावली. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, संयोजक अमित बागुल, पुणे नवरात्र महोत्सवाचे पदाधिकारी नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, घनःश्याम सावंत आदींसह मान्यवर उपस्थित होते.



उल्हास पवार म्हणाले, "आपल्या देशात सर्वधर्म समभाव आहे आणि तो सातत्याने गेली २० वर्षे ख्रिसमस संध्या या उपक्रमाद्वारे आबा बागुल जोपासत आहेत, ही कौतुकाची बाब आहे. असे उपक्रम व्यापक स्तरावर होण्याची गरज आहे."  आबा बागुल म्हणाले, "आज देशात सर्वधर्मसमभाव आहे, त्यामागे काँग्रेसचा विचार आणि पक्षाची शिकवणूक आहे. ख्रिसमस संध्यानिमित्त बाळगोपाळांना मनसोक्त आनंद देण्यासह सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न होता.