सीएए, एनआरसी विरोधात रिपब्लिकन सेनेचे आंदोलन* पुणे : केंद्र सरकारने पारित केलेला नागरित्व सुधारणा

*सीएए, एनआरसी विरोधात रिपब्लिकन सेनेचे आंदोलन*


पुणे : केंद्र सरकारने पारित केलेला नागरित्व सुधारणा कायदा (सीएए, एनआरसी) संविधानविरोधी व जातीधर्मात तेढ निर्माण करणारा आहे. हा कायदा पारित झाल्यापासून देशभर विविध ठिकाणी हिंसक आंदोलने होत असून, अनेकांचा जीवही त्यात गेला आहे. मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आदी समाजाकडून या कायद्याला कडाडून विरोध होत असून, घटनेचे महत्व कमी करणारा हा कायदा त्वरित रद्द करावा, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित रिपब्लिकन श्रमिक सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व रिपब्लिकन श्रमिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, ससून रुग्णालयाजवळ, पुणे येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष गौतम माने, जिल्हाध्यक्ष बापू शिंदे, उपाध्यक्ष उत्तम शिंदे, पुणे शहराध्यक्ष निलेश थोरात, जिल्हा महिला अध्यक्षा उषा उनवणे, सतीश गरुड, महेंद्र गायकवाड, ज्योती खरात, वैशाली शिंदे, सतीश शिंदे, अंकुश हांडे, विलास गायकवाड, महादेव शिंदे, नेताजी थोरात, आकाश म्हात्रे, कुमार कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महेश शिंदे म्हणाले, "संसदेत हा कायदा पारित झाल्यानंतर देशात अराजकता माजली आहे. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने होत असून, करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे जीव गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय सक्षम असे संविधान दिलेले असताना, पुन्हा अशा कायद्याची गरज काय आहे. हा कायदा नागरिकांच्या हिताचा नाही, तर भाजपप्रणीत सरकारच्या हिताचा आहे. केवळ मताचे राजकारण करण्याचा प्रयत्न मोदी-शहांकडून केला जात आहे. त्यामुळे देशात अराजकता आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण करणारा हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा." यावेळी कार्यकर्त्यांनी कायद्याच्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.