पुण्यात भारत आणि श्रीलंका आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्याचे १० जानेवारी २०२० रोजी आयोजन ! ट्वेन्टी-२० सामन्याच्या तिकीट विक्रीस १७ डिसेंबरपासून सुरूवात !!

पुण्यात भारत आणि श्रीलंका आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्याचे १० जानेवारी २०२० रोजी आयोजन !
ट्वेन्टी-२० सामन्याच्या तिकीट विक्रीस १७ डिसेंबरपासून सुरूवात !!


पुणेः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्याचे दि. १० जानेवारी २०२० रोजी आयोजन करण्यात आले आहे. २०२० या नवीन वर्षात तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना पुण्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे.


भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पुण्यामध्ये ट्वेन्टी-२० सामन्यात अजूनपर्यंत पराभूत केलेले नाही. यावेळेला भारतीय संघाला ही संधी मिळणार आहे. पुण्यामध्ये होणार्‍या या सामन्याचे एक वैशिष्ठ असणार आहे तसेच पुण्यामध्ये आयोजित होणारा हा तिसरा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना ठरणार आहे.


एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे याआधी झालेल्या दोन्ही आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाला संमिश्र यश मिळाले होते. २०१२ मध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता. २०१६ मध्ये झालेल्या दुसर्‍या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता.


भारतीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे संघ यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. पण आयसीसीने झिम्बाब्वे संघावर बंदी आणल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका संघाला याच आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० मालिकेसाठी आमंत्रित केले.


या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० मालिकेमधील पहिला सामना नवीन वर्षात ५ जानेवारी २०२० रोजी गुवाहाटी येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना ७ जानेवारी २०२० रोजी इंदौर येथे तर, तिसरा सामना शुक्रवारी, १० जानेवारी २०२० रोजी पुण्यामध्ये होणार आहे. पुण्यात होणारा हा तिसरा सामना मालिकेमधील 'निर्णायक' होऊ शकतो. यामुळे पुण्यातील सामन्याला वेगळेच महत्व प्राप्त होण्याची शक्यता आहे.


पुर्वेकडील विद्येचे माहेरघर म्हणून लौकिक असलेल्या पुण्यामध्ये श्रीलंका संघ दुसर्‍यांदा ट्वेन्टी-२० सामना खेळण्यास येत आहे. यामुळे पाहुणा संघ पुण्यातील वातावरणास अगदीच नवखा नसणार आहे.


महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे आयोजित होणारा हा नववा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे. याआधी या स्टेडियममध्ये दोन ट्वेन्टी-२० सामने, चार एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने आयोजित करण्यात आले आहेत.


भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिकाः
पहिला सामनाः गुवाहाटी- रविवार, ५ जानेवारी २०२०;
दुसरा सामनाः इंदौर- मंगळवार, ७ जानेवारी २०२०;
तिसरा सामनाः पुणे- शुक्रवार, १० जानेवारी २०२०;