पुणे प्रवाह न्युज पोर्टल
अरेरे!... ७० हजारांसाठी बापाने एका महिन्याच्या चिमुकल्यालाच विकलं....
हैदाराबाद :- बाळाला पित्याने ७०,००० रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी हैदराबाद शहरातून या बाळाची सुटका केली असून त्याची रवानगी बाल कल्याण विभागाकडे करण्यात आली आहे.
इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आपल्या बाळाला पतीनं विकल्याची तक्रार एका महिलेनं पोलिसांमध्ये दाखल केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत हैदराबाद पोलिसांनी बाळाची शोधमोहिम सुरु केली.
सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी बाळाचा शोध घेतला असता त्यांना एका ठिकाणी ते आढळून आलं.
या बाळाचे आईवडील फुटपाथवर राहतात.
आपलं जीवन जगण्यासाठी ते छोटी-मोठी कामं करतात. भीकही मागतात असं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की, एक सधन जोडपं फुटपाथवर राहणाऱ्या या कुटुंबाच्या जगण्याचं अनेक दिवसांपासून निरिक्षण करत होतं.
त्यानंतर, काही दिवसांनंतर या जोडप्याने बाळाच्या पित्याची रस्त्यावर भेट घेतली आणि बाळाच्या बदल्यात ७०,००० रुपयांची ऑफर दिली.
याप्रकरणी जुवेनाईल जस्टिस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आसून या बाळाची रवानगी सरकारच्या बाल कल्याण विभागाकडे करण्यात आली असून अद्याप पुढील तपास सुरु आहे.