देशात जल आंदोलनाची गरज केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे विचारः दुसर्‍या ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ चे ऑनलाईन उद्घाटन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल कृपया प्रसिध्दीसाठी दि. 2 डिसेंबर 2020


देशात जल आंदोलनाची गरज


केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे विचारः दुसर्‍या ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ चे ऑनलाईन उद्घाटन


पुणे, दि. 2 डिसेंबर: “जल सुरक्षा आणि जल नियोजनाची अत्यंत गरज असून त्यासाठी जल आंदोलनाची गरज आहे. पाण्याचा पुर्नउपयोग कसे करता येईल या वर विचार करण्याची वेळी आली आहे. जल समृध्दीतूनच देशाचा विकास होईल. पाणी हे जीवन असल्याने त्याला वाया घालवू नका.” असे विचार केंद्र सरकारच्या जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी मांडले. 


‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटेतर्फे 2 ते 4 डिसेंबर या दरम्यान आयोजित तीन दिवशीय दुसर्‍या ऑनलाईन ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


छत्तीसगढ राज्याचे पंचायत आणि ग्रामिण विकास मंंत्री श्री. टी. एस. सिंग देव, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण श्री. अण्णा हजारे, इस्त्राईल सहकार संस्थेचे प्रमुख डॅन अलुफ व बाएफचे अध्यक्ष श्री. गिरीष सोहनी हे विशेष अतिथी उपस्थित होते.


अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.


या प्रसंगी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते सरपंच संसदेचे प्रमुख संयोजक राहुल विश्वनाथ कराड, महाराष्ट्र सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील आणि सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.


गजेंद्रसिंग शेखावत म्हणाले,“पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल शक्ति मंत्रालयाची स्थापना केली. आज याच्या माध्यमातून संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण केले आहे. पंतप्रधानांनी देशातील सर्व ग्रामपंचायत आणि सरपंचांना पत्राच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्यास सांगितले. तसेच, गावातील पाणी गावात, आणि शेतातील पाणी शेतात असेल तर विकास होईल. कोविडच्या काळात ही जलशक्ति विभागाकडून संपूर्ण देशात 7 लाख जल संचयनाचे काम पूर्ण झाले आहे. पाणी वाचविण्यासाठी या विभागाने 15 हजार कोटी रूपये खर्च केले. नव भारत निर्मितीचा मार्ग हा गावातूनच जातो त्यामुळे गावांना सशक्त करण्यासाठी जल शक्ति अत्यंत महत्वाचे आहे.”


अण्णा हजारे म्हणाले, “सरपंचांनी सदैव असा विचार करावा की मी गावाचा नाहीतर देशाचा विकास करणार आहे. शुद्ध चारित्र्य, शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि निष्कलंक जीवन ज्यांचे असते तो विकासदूत बनतो. सरपंचानी विकास कार्य करतांना विरोधकांना कधीही शब्दांनी उत्तर देऊ नका तर आपल्या कथनी आणि करणीने दयावे. महात्मा गांधी म्हणायचे की देशाची अर्थव्यवस्था बदलावयाची असेल तर प्रथम गावाची अर्थव्यवस्था बदलणे गरजेचे आहे. त्या शिवाय देश बदलणार नाही. गावाचे परिवर्तन करावयाचे असेल तर प्रकृती आणि मानवाचे शोषण करू नका असाही सल्ला त्यांनी दिला.”


डॅन अलुफ म्हणाले, “ इंडो इस्त्राईल अ‍ॅग्रिकल्चर प्रोजेक्ट वर काम करून संपूर्ण जगात चांगली बाजार पेठ मिळविणे गरजेचे आहे. त्यासाठी, सरकारी, खाजगी आणि सहाकरी संस्थांना पुढे यावे लागेल. पाण्यासारख्या समस्यांवर इस्त्राईलने खूप मोठे यश मिळविले आहे. त्यांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग शेतीसाठी केला असून तोच प्रयोग भारतात करावा. अत्याधुनिक आणि नवे तंत्रज्ञानाचा वापर करावा. महाराष्ट्रात ड्रिप इरिगेशनची गरज आहे. कुठलेही कार्य हे पुढील तीन वर्षाचे लक्ष ठेऊन करावे. शेती करतांना कामाचे नियोजन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा.”


टी.एस. सिंग देव म्हणाले, “देशातील सर्वात जुनी व्यवस्था ही पंचायतराजची आहे. त्यांना पंच परमेश्वरांचा दर्जा सुद्धा देण्यात आला आहे. वेगवेगळ्या राज्यात याचे कायदे एकसारखे नाही, परंतू महाराष्ट्रात ही व्यवस्था अत्यंत मजबूत आहे. त्यांच्याकडून सर्व राज्यांना शिकण्याची गरज आहे. पंचायतराज्य व्यवस्थेमुळे महिलांना मोठ्या प्रमाणत बळ मिळाले आहे. तसेच, युवक ही याच्या माध्यमातून समोर येतांना दिसत आहे. देशातील पंचायतराजला जी रक्कम देण्यात येत आहे त्यात वृद्धि करण्याची गरज आहे. त्यातूनच देशाचा विकास होईल.” 


गिरीष सोहनी म्हणाले, “सरपंचांनी मंंत्र, तंत्र, गती आणि दिशा या चार गोष्टी सदैव लक्षात ठेवावे. तसेच गांव विकासासाठी सात सुत्र महत्वाचे आहे त्यात तरूणाई, तितिक्षा, शाश्वती, हरित अर्थव्यवस्था, उद्यम, उद्दिष्ट आणि टप्पा चा समावेश आहे. त्याचे पालन केल्यास विकास आपोआपच होईल. महात्मा गांधी सतत म्हणायचे की गावाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे आज देशातील 6 लाख गावांना सशक्त व्हावे लागेल.”


डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील आदर्श गाव या संकल्पनेच्या आधारे ही सरपंच संसदेची संकल्पना आहे. सरपंचाच्या माध्यमातून गाव आणि त्यातून देशाचा विकास होईल. 730 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी गाव कसे असावे, त्याचे नियोजन कसे करावे तसेच पाण्याची सुविधा कोणत्या पद्धतीने हवी हे सांगून ठेवले आहे. आज आम्हाला त्याचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे आज ग्रामविकास, आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर जोर दिला जात आहे.”


राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“सरपंच संसद ही सरपंचासाठी एक स्वतंत्र असे व्यासपीठ निर्माण केले आहे. ग्रामीण क्षेत्राला जवळ आणण्यासाठी ही संसद अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी या शिक्षण संस्थने असे कार्यक्रम घ्यावे. भविष्यात ग्रामीण क्षेत्रातील समस्या सोडवायच्या असतील तर या संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समोर यावे लागेल.”


योगेश पाटील म्हणाले, “राष्ट्रनिर्माण कार्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सरपंचाने अपडेट राहून स्मार्ट कार्य करावे. यासाठी हा मंच राहुल कराड यांनी उपलब्ध करून दिला आहे. ही संसद साकारताना गौतम बुद्धांची मानवता, तुकोबा आणि ज्ञानेश्वरांची सहिष्णूता, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कौशल्य आणि महात्मा गांधी यांचे ग्रामविकास या चतुःसूत्री वर आधारित आहे.”


रविंद्रनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले.


प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले. 


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान