पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*ध्वजदिन निधी संकलनात प्रत्येकाने आपला अधिकाधिक सहभाग द्यावा*
*अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख: ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ*
पुणे, दि. 8: देशाच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र कर्तव्यावर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून साजरा होणा-या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात प्रत्येकाने आपला अधिकाधिक सहभाग द्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या हस्ते ध्वजदिन 2020 निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्यासह माजी सैनिक त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करुन करण्यात आली. यावेळी सशस्त्र सेना ध्वजदिन संकलनात महत्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅचेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधीत सहभाग देणाऱ्यांकडून निधी संकलित करण्यात आला.
अपर जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, आज सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून सैनिकांच्या कुटुंबांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्ताने संकलित केलेला निधी सैनिकांच्या कल्याणासाठी खर्च केला जातो, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी ध्वजदिनी निधी संकलनात पुढाकार घ्यावा, आपण सर्वांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन करणे हे समाजातील मोठे योगदान असल्याचे सांगतानाच सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबदध असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांनी मिळविलेल्या यशाबदल त्यांनी कौतुक केले.
प्रास्तविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासणे म्हणाले, शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या अडी-अडचणी दूर केल्या जातात. युध्दात किंवा युध्दजन्य परिस्थितीत अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा उपयोग केला जातो. कोरोना संक्रमणामुळे उद्भवलेल्या आपत्तीजनक स्थितीतही नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे 90 लाख रुपयांचे उद्दिष्ट साध्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विशेष कामगिरी केलेल्या माजी सैनिक तसेच दहावी, बारावी परिक्षेत यश मिळविलेल्या सैनिकांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी सैनिक, विरमाता, विरपत्नी यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.