वाहतूक समस्येच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्राधिकरणातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे-विभागीय आयुक्त सौरभ राव*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* 



*वाहतूक समस्येच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्राधिकरणातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे-विभागीय आयुक्त सौरभ राव*

पुणे दि. 9: पुणे व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासोबतच वाहतुक विषयक विविध समस्या सोडविण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA) ची स्थापना करण्यात आली आहे. वाहतूक समस्येच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्राधिकरणातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज केल्या. 

       विधानभवन कार्यालयाच्या सभागृहात पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA)ची चतुर्थ बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र जगताप, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, महाराष्ट्र मेट्रो रेलचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

          विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक विषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणात पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांची भूमीका अत्यंत महत्वाची आहे. पुणे शहर आणि परिसरासाठी समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून दीर्घकालीन उपाययोजना आखून त्यावर कृती करण्याची गरज आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व विभागांनी समन्वयाने काम करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. प्राधिकरणाचे काम करताना यामध्ये सर्वसमावेशकता येण्यासाठी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांबरोबरच वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले. 

          या बैठकीत नवीन मेट्रो मार्ग महामेट्रो कॅरिडोर 1 मधील निगडी-कात्रज, चांदणी चौक-वाघोली, हिंजेवाडी-शिवाजीनगर, शिवाजीनगर-हडपसर, हिंजेवाडी-चाकण तसेच महामेट्रो कॅरिडोर 2 मधील वारजे-स्वारगेट, वाघोली-हिंजेवाडी, चांदणी चौक-हिंजेवाडी प्रस्तावित मार्गाबाबत आढावा घेण्यात आला. याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सविस्तर अहवाल सादर करणे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ चौकातील नवीन एकात्मिक दुमजली उड्डाणपुल बांधणी आराखडे अंतिम करणे. याअनुषंगाने उड्डाणपुल संरचना अतिंम करुन लवकरात लवकर पुणे महानगरपालिका आणि शासनास सादर करणे, सर्व कामे एकाचवेळी पुर्ण करणे, पुणे महानगरपालिकेने यासंबंधी स्वतंत्र जबाबदारी घेण्याबाबत निर्णय घेणे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. कंपनीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीपर्यंत वाहतूक सेवा विस्तारित करण्यास व त्याअनुषंगिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी संबंधित यंत्रणेस समन्वय साधण्याबाबत चर्चा झाली. 

        या बैठकीला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.