१ डिसेंबर जागतिक एड्स दिवस 'अॅक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिन्ड्रोम' म्हणजे (AIDS) 'एड्स'. शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होत जाते

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


* व त्यामुळे आढळणारा हा लक्षणसमुच्चयरुपी रोग आहे. एका विषाणूंमुळे हा रोग होतो. असे खूप संशोधनानंतर लक्षात आले आहे. या विषाणूला नाव या रोगसदृश दिले गेले. 


ह्युमन इम्यूनो व्हायरस १- (HIV-1)


आपल्या शरीरातील पांढर्‍या रक्तपेशींपैकी काही पेशींकडे सर्व प्रकारच्या रोगजंतूशी प्रतिकार करण्याचे काम सोपवलेले आहे. एड्सचे विषाणू शरीरात प्रवेश केल्यावर या विशिष्ट (टी-४) पेशींवरच हल्ला चढवतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमताच नष्ट होते. अगदी नेहमी आढळणाऱ्या सर्दी, पडसे, जुलाब यांसारख्या साध्या रोगांनीसुद्धा असा रुग्ण हैराण होऊ लागतो; कारण या रोगांना आळा घालण्याची यंत्रणाच नष्ट झालेली असते. वरवर पाहता साध्या दिसणाऱ्या, पण पुन:पुन्हा सतत उद्भवत राहणाऱ्या आजारांनी रुग्णाचा काही महिन्यांतच बळी घेतला जातो. याच कारणामुळे ज्या वेळी एड्सचे रुग्ण प्रथमच आढळले, तेव्हा त्यांचे निदान होऊ शकले नाही. आजार नेहमीचा, औषधे नेहमीची होती. पण रुग्णाचा प्रतिसादच नाही. ही स्थिती भल्याभल्या डॉक्टरांना बुचकळ्यात पाडत होती.


वारंवार केल्या गेलेल्या रक्ताच्या तपासण्यांतून मग या व्हायरसचा प्रथम शोध लागला. शास्त्रीय पद्धतीने त्याची वाढ करण्यातही (Culture) यश मिळाले. पण मुख्य अडचण म्हणजे या व्हायरसच्या वाढीला अटकाव करेल वा त्याला नष्ट करेल, असे औषध मिळवण्यात आजवर सतत अपयशच आले आहे. एवढेच नव्हे, तर त्याच्या विरोधी खात्रीशीर व निर्धोक प्रतिबंधक लस तयार करणे अजूनही शक्य झालेले नाही.


एड्सचा प्रसार शरीरसंबंधातून होतो. दुसऱ्या प्रकारचा प्रसार रक्तामार्फत होऊ शकतो. एकाचे रक्त दुसऱ्याला दिले असता जर देणार्याचे रक्त या विषाणूने दूषित झाले असेल तर रक्त घेणारा रुग्ण एड्सग्रस्त होऊ शकतो. हाच प्रकार अमली पदार्थ टोचून घेणाऱ्यांच्या सुयांमार्फतही होऊ शकतो. अर्थातच वरील सर्व प्रकारांत एकाला एड्सची बाधा झालेली असणे आवश्यक असते. एड्सच्या प्रसाराची ही पद्धत पक्की लक्षात ठेवली म्हणजे एड्सची मनातील भीती जायला हरकत नाही.


कोणत्याही परिस्थितीत एड्सच्या रुग्णाबरोबर गप्पा मारून, हस्तांदोलन करून, त्याच्या घरात वावरल्याने वा एकच फर्निचर, प्रसाधनगृह, वस्तू ताटवाट्या वापरल्याने एड्सचा प्रसार होत नाही.


आज साऱ्या जगाला एड्सने भयग्रस्त केले आहे. मुख्य कारण म्हणजे एड्स झाल्यावर त्यावर कसलाही खात्रीचा इलाज आज उपलब्ध नाही. त्याला प्रतिबंध म्हणजे रुग्णांशी शरीरसंबंध व रक्तसंपर्क न येऊ देणे एवढाच. एड्सची लागण झाल्याचे पहिले लक्षण रक्ततपासणीमध्येच लक्षात येऊ शकते. एलिझा व वेस्टर्न ब्लाॅट या रक्ततपासणीनंतर एखाद्याला या रोगाची लागण झाली आहे वा नाही एवढेच कळते. ही रोगाची सुप्तावस्था असते. या अवस्थेत कित्येक वर्षे तशीच जाऊ शकतात. यानंतरची अवस्था म्हणजे विषाणूचे आक्रमण सर्वांगीण होऊन रोग दिसू लागण्याची (Full Blown Aids). एकदा ही अवस्था सुरू झाली की मग रुग्णाचे आयुष्य जेमतेम सहा महिने ते साठ महिने एवढेच राहते.


पाश्चात्य देशात सुमारे ३० वर्षे या रोगाने धुमाकूळ घातला आहे. भारतात १९८४ साली या रोगाने पहिला रुग्ण मरण पावला. पण त्यानंतर आज या आजाराचे कित्येक रुग्ण आपल्या इथे नोंदले गेले वा मृत झाले आहेत. हिमनग जसा एक अष्टमांश पाण्यावर दिसतो, तसाच हा रोग आहे म्हणा ना. एक रुग्ण दिसतो वा सापडतो, तेव्हा किमान दहा जण सुप्तावस्थेत लागण झालेले असतात.


जागतिक आरोग्य संघटना व सर्व प्रगत देश यांचे सध्याचे सर्व लक्ष या रोगाचा प्रतिबंध करणे व त्यावर औषध शोधणे यांवरच एकवटलेले आहे. एड्स प्रतिबंधासाठी अनेक औषधांचा शोध सतत चालू असून त्यांपैकी एझेडटी या लघुनावाने ओळखले जाणारे अौषध सध्या भारतात उपलब्ध आहे. एड्स झालेल्या मातेच्या नवजात अर्भकापासून एड्स झाल्याचे निश्चित झालेल्या कोणत्याही रुग्णासाठी याचा वापर केल्यास आयुर्मान वाढू शकते. मात्र खात्रीलायक प्रतिबंध करणारी प्रतिबंधक लस मात्र उपलब्ध नाही. तसेच एड्स पूर्ण बरा करणारे औषधही सापडलेले नाही.