पुणे प्रवाह न्युज पोर्टल
तळागाळातील समाजासाठी झटणारा कार्यकर्ता- अशोक जंगले
कर्जत दि.3 गणेश पवार
रायगड जिल्ह्यात कुपोषण निर्मूलन,बालहक्क,मधील हक्क,आदिवासी कातकरी जमात,आरोग्य व्यवस्था अशा क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांचे आज 2 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.दुपारी एक वाजता त्यांना हृदयविकाराचे दोन झटके लागोपाठ आल्याने त्यांना प्रथम कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर नवी मुंबईत डी वाय पाटील रुग्णालयात दाखल केले.परंतु दिशा केंद्र या नावाजलेल्या सामाजिक संघटनेचे कार्यकारी प्रमुख असलेले अशोक जंगले यांना आरोग्य व्यवस्था वाचवू शकली नाही.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावचे मूळ रहिवासी असलेले अशोक नारायण जंगले यांनी विद्यार्थी दशेपासून आपली सामाजिक बांधिलकी जपली होती.औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात एमए चे शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यापीठ अंतर्गत सत्यशोधक विद्यार्थी चळवळीचे काम सुरू केले होते.पदवित्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गंगाखेड तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास कुलकर्णी यांच्या सोबत पाच वर्षे काम केले.तेथे कुलकर्णी यांच्या बचपन बचाव,रचनात्मक आंदोलन आणि महिला अत्याचार या क्षेत्रात काम केले.ते करत असताना अशोक जंगले यांना नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे असलेल्या दिशा केंद्रात नोकरी मिळाली.1990 पासून नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दिशा केंद्र च्या मुख्यालयात जंगले यांनी दोन वर्षे सामाजिक कार्यकर्ता म्हणून नोकरी केली.
2007 मध्ये त्यांची रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दिशा केंद्राच्या कर्जत प्रकल्पावर बदली करण्यात आली.कर्जत तालुक्यातील आल्यानंतर पुढच्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि आज त्यांना दोन मुली आहेत.कर्जत ला दिशा केंद्राचे काम सुरू केले,त्यावेळी त्यांनी वन हक्क कायदा चळवळ आपल्या संस्थेसह काम करणाऱ्या जागृत कष्टकरी संघटना यांच्या बरोबर आदिवासींना वन हक्क मिळवून देण्यासाठी काम केले.त्याचवेळी कर्जत तालुक्यात कुपोषण निर्मूलनासाठी बाळ उपचार केंद्र,अंगणवाडी स्तरावर डॉ कलाम अमृत आहार योजना,आदिवासी आश्रमशाळा, बालिका अत्याचार विरोधात चाईल्ड लाईन तसेच अंगणवाडी पोषण आहाराचा कॅग प्रकल्प आणि आरोग्य सुविधा याबाबत काम केले.गेली काही वर्षे आदिम जमातीमधील कातकरी समाजाला रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी मोठी चळवळ हाती घेतली होती.तर आदिम जमातीचे असंख्य प्रश्न त्यात वीटभट्टीवर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजना राबविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.जिल्ह्यातील अनेक शासकीय योजना राबविण्यासाठी शासनाने त्यांच्या संस्थेची निवड देखील केली होती.
कोरोना मुळे लागलेल्या लॉक डाऊन मध्ये आदिवासी समाजाला तसेच विधवा,मोलमजुरी करणाऱ्या महिला यांना अनेक संस्थांच्या माध्यमातून धान्य मिळवून देण्याचे काम त्यांनी मागील सात महिने केले आहे.आज 2 नोव्हेंबर रोजी कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे आयसीयू सेन्टर चे लोकार्पण प्रसंगी त्यांना भाषण करण्याची सूचना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली.आज दुपारी सव्वा बारा वाजता यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात भाषण केले आणि तेथे कर्जत मधील कुपोषण दूर करण्यासाठी एनआरसी सुरू करण्याची मागणी केली. तसेच रक्तपेढी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नसल्याने चार महिलांचे प्राण गेले आहेत,त्यामुळे लवकर रक्तपेढी सुरू करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती.12.50 मिनिटांनी कार्यक्रम आटोपून जंगले हे आपल्या कार्यालयात जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तेथील कर्मचारी वर्गाने त्यांना लगेच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.आज ज्या आयसीयु सेन्टरचे उद्घाटन झाले त्याच कक्षात जंगले यांना दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.परंतु अशोक जंगले यांना हृदयविकाराचे एका पाठोपाठ दोन धक्के आल्याने त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नव्याने दाखल झालेल्या कार्डियेक रुग्णवाहिका मधून अशोक जंगले यांना साधारण सव्वा वाजता नवी मुंबईत असलेल्या डी वाय पाटील रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.तेथे पोहचल्यावर उपचार सुरू करण्यात आले,परंतु त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज काही तासात संपली.अशोक जंगले यांचे पार्थिव सायंकाळी सात वाजता कर्जत येथे आणण्यात आले आणि दिशा केंद्रात दर्शनासाठी ठेवण्यात आले.त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहर येथे नेण्यासाठी कर्जत येथून प्रवास सुरु केला आहे.
कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावात,वाडी वस्तीत सामाजिक बांधिलकी ठेवून पोहचलेले अशोक जंगले यांच्या जाण्याने कर्जत तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.गंगाखेड येथे त्यांची आई,भाऊ,बहीण,भावाची पत्नी असा परिवार असून सहा वर्षपूर्वी वडील वारले आहेत,तर भाऊ ड्रायव्हर आहे.
............ गणेश पवार-पत्रकार