पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कृषी पर्यटन' राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'संजीवनी' ठरेल
पांडुरंग तावरे यांचे मत; सूर्यदत्ता शिक्षण संस्थेतर्फे 'हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल-टुरिझम'वर आंतरराष्ट्रीय वेबिनार
पुणे : "हॉटेल मॅनेजमेन्ट क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळले पाहिजे. हॉटेल मॅनेजमेंट व कृषी पर्यटन एकमेकांना पूरक आहे. कृषी पर्यटनाला चालना मिळाली, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळेल. सूर्यदत्ता संस्थेतर्फे उपलब्ध होणाऱ्या कृषी पर्यटनातील नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत होईल," असे मत कृषी पर्यटन क्षेत्रातील प्रख्यात उद्योजक पांडुरंग तावरे यांनी व्यक्त केले.
'नॅक' मानांकन प्राप्त नामांकित सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमतर्फे (एससीएचएमटीटी) 'एक्झेनिया : बेस्टोविंग हॉस्पिटॅलिटी' या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी पांडुरंग तावरे बोलत होते. इंडस्ट्री-कनेक्ट अँड नॉलेज मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह' अंतर्गत झालेल्या या वेबिनारला 'सूर्यदत्ता'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, सिद्धांत चोरडिया यांच्यासह उद्योगातील तज्ज्ञ, ज्येष्ठ अभ्यासक, वैश्विक स्तरावर पसरलेले सूर्यदत्ता संस्थेचे माजी विद्यार्थी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. उद्योगातील दिग्गजांनी या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना मौल्यवान ज्ञान आणि उद्योगातील अंतर्भाव स्पष्ट करून सांगितले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "कृषी पर्यटनाशी संलग्नित अनेक क्षेत्र आहेत. स्थानिक उत्पादने, ठिकाणे आणि गोष्टींना व्यवस्थितपणे मार्केट केले, तर रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकेल. हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी पर्यटनामुळे अनेक संधी खुल्या होतील. भारत कृषिप्रधान देश असल्याने येथे कृषी पर्यटन मोठ्या प्रमाण विकसित झाले, तर आत्मनिर्भर भारत बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास हातभार लागेल."
विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटीच्या सर्व विभागांशी संबंधित बदलत्या संकल्पना आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची ओळख झाली. फूड स्टाइलिंग, फूड ब्लॉगिंग, एअरपोर्ट केटरिंग, वाईन अॅप्रिसिएशन, मिक्सोलॉजी अँड स्क्रब्स, क्लाऊड किचेन्स, फूड हिस्टरीयन, सुविधा व्यवस्थापन यासह इतर अनेक गोष्टी समजून घेता आल्या. 'एससीएचएमटीटी'सह महाराष्ट्रातील इतर संस्था व महाविद्यालयातील एकूण २५० विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला.
क्लियर वॉटर हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेफ नितीन टंडन यांनी फूड स्टाईलिंगवरील रोमांचक सामग्रीचे वर्णन केले आणि फूड स्टायलिस्टच्या करियरविषयी आणि करिअरच्या मार्गांवरही चर्चा केली. फूड स्टायलिस्ट होण्यासाठी स्वयंपाकघरात प्रमुख मूलभूत तत्त्वे ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या दुसर्या आणि तिसर्या सत्रात युरेका अराझो शेफ अमर श्रीवास्तव यांनी धाडसी करिअर व प्रॉफेशनल पेस्ट्री मेकिंग यावर, शेफ राहुल वली यांनी खाद्य इतिहास, रमेश उपाध्याय यांनी फॅसिलिटी मॅनेजमेंटमधील करिअर, बापजी जिनगा यांनी मिक्सिंग फ्ल्यूड्स शास्त्र, शेफ राजेश शेट्टी यांनी एअरपोर्ट केटरिंग, श्री. कार्तिक यांनी लॉंड्री मॅनेजमेंट, शेफ रविराज यांनी क्लाउड किचन कॉन्सेप्ट आणि शेफ अकल्पित प्रभुणे यांनी फ्रुट वाईन्स या क्षेत्रातील करिअरवर मार्गदर्शन केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स नियमितपणे त्यांचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण उपक्रम, कार्यशाळा आणि उद्योग कनेक्ट उपक्रम आयोजित करतात. अलिकडच्या काळात 'एससीएचएमटीटी'ने आपल्या इंडस्ट्री कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत उद्योग तज्ज्ञ, थीमलंच, माजी विद्यार्थी मेळावा, स्वयंपाकासंबंधी कला कार्यशाळा, बेकरी, एफ अँड बी सर्व्हिस, निवास व्यवस्था, मिक्सोलॉजी, फूड स्टाईलिंग, हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
हॉटेल मॅनेजमेंट आणि ट्रॅव्हल टुरिझमच्या विविध क्षेत्रांतील विविध सत्रांमधून मौल्यवान मार्गदर्शन मिळाल्याची भावना विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी सूर्यदत्ताच्या या उपक्रमाचे कौतुक करून धन्यवाद दिले.