मनमानी कारभाराबद्दल महिला सरपंच आणि त्यांच्या सरकारी नोकर असलेल्या पतीवर आरोप.... कर्जतच्या नांदगाव ग्रामपंचायत मधील घटना

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



मनमानी कारभाराबद्दल महिला सरपंच आणि त्यांच्या सरकारी नोकर असलेल्या पतीवर आरोप....


कर्जतच्या नांदगाव ग्रामपंचायत मधील घटना


लाखोंची देयके अदा पण कागदोपत्री कोणतेही पुरावे नसल्याचे पंचायत समिती स्तरावरील चौकशी मध्ये सिद्ध


कर्जत,ता.3 गणेश पवार


               कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या महिला सरपंच यांनी आपल्या नातेवाईकांना विकासकामांचा ठेका दिला आहे.त्याचवेळी लाखो रुपयांची विकास कामे केली आहेत,पण त्यांची कोणतीही कागदपत्र उपलब्ध नाहीत हे चौकशी मध्ये सिद्ध झाले आहे. मासिक बैठका न घेणे,दोन वर्षे सदस्यांना मासिक बैठकीचा भत्ता न देणे,ग्रामपंचायत हद्दीबाहेर राहत असल्याने कागदपत्रे ग्रामस्थांना वेळेवर उपलब्ध न होणे आणि मुख्य म्हणजे सरपंच दीपिका आसवले यांचे पती हे सरकारी नोकरी करीत असताना देखील ग्रामपंचायतमध्ये बसून कारभार पाहत असतात यासारखे अनेक आरोप नांदगाव ग्रामपंचायत मधील सहा सदस्यांनी आरोप केला आहे.दरम्यान,तालुका पंचायत समिती कडून चौकशी अहवाल रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कार्यवाही साठी पाठविण्यात आला आहे.


                         कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या नांदगाव ग्रामपंचायत मध्ये 2018 मध्ये दीपिका नाना आसवले या थेट सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या.त्यानंतर च्या काळात त्यांनी आपले सहकारी सदस्य यांना विश्वासात घेऊन काम केले नाही.त्यामुळे मनमानी कारभार केल्याचा ठपका ठेवून तब्बल सात ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच आसवले यांच्यावर कर्जत पंचायत समितीला तक्रार अर्ज करून विविध आरोप केले आहेत.23 जुलै 2020 रोजी नांदगाव ग्रामपंचायत मधील रोहिणी वामन कराळे,मुकुंद बनकर,भाऊ चिमटे,उज्ज्वला रवींद्र फोपे,अर्चना अर्जुन फोपे,पल्लवी प्रवीण कारोटे आणि ग्रामस्थ रवी फोपे यांनी केला होता.त्या अर्जाची सुनावणी आणि चौकशी कर्जत पंचायत समिती मध्ये 31ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.त्या चौकशी मध्ये सहा सदस्यांनी केलेले आरोप यांच्यावर विस्तार अधिकारी आणि चौकशी अधिकारी सुनील आयरे यांनी जबाब घेतले आणि ग्रामपंचायत दफतर तपासले. त्यात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे उपलब्द नाहीत असे सिद्ध झाले असून हा अहवाल कर्जत पंचायत समिती कडून गटविकास अधिकारी यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे.


               चौकशीमध्ये ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी मासिक सभा घेतल्या नाहीत, तसेच मासिक सभांचे अजेंडे देखील सदस्यांना पाठवले नाहीत.त्याचवेळी सदस्यांना मासिक बैठक भत्ता देखील दिला नाही हे कागदोपत्री सिद्ध झाले आहे.त्यात ग्रामपंचायत मध्ये काम करणारे डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना 25 हजाराचे मानधन देण्यासाठी रक्कम सरपंच यांच्या सहीने काढण्यात आली,मात्र डाटा एन्ट्री ऑपरेटर जीवन साबळे यांनी मानधन अद्याप मिळाले नाही.सरपंच या मुलांच्या शिक्षणासाठी नांदगाव येथून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरळ गावात राहतात,त्यामुळे तीन सदस्य तसेच सखाराम वाघमारे,राम मुकणे यांना काही दाखले आवश्यकता असताना नेरळ येथे ते सर्व येऊन देखील त्या सर्वांना मिळाले नाहीत.सरपंच ग्रामपंचायत कार्यालयापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात राहत असल्याने त्यांनी कागदपत्र दिली नाहीत आणि त्यामुळे ग्रामपंचायत मधील विठ्ठलवाडी येथील नवीन स्मशानभूमी बांधण्याचे काम स्थानिकांना मिळाले नाही.ग्रामपंचायत निधी आणि 14 वित्त आयोग निधी यांची विकास कामे ही आराखड्यात नमूद आहेत,पण प्रत्यक्ष जागेवर कामे नाहीत आणि असे असताना देखील सरपंच आसवले यांनी त्यांची देयके अदा केली आहेत.त्यातील कामांचा ठेका हा सरपंच यांनी आपले नातेवाईक यांना दिला असून त्या बाबत चौकशी केली असता काही ठेकेदार हे सरपंच दीपिका आसवले यांचे जवळचे नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याचवेळी 14 वित्त आयोगाचे 22 लाख रुपयांचा निधी सरपंच यांनी विविध विकास कामांवर खर्च केले आहेत असे दाखवले आहे,परंतु विकास कामांच्या आराखड्याला मासिक सभेने किंवा ग्रामसभेने मान्यता दिलेली नाही असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शासनाकडून येणारा मुद्रांक शुल्क आणि घरपट्टी कर यांचा निधी सरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता सुविधा उपलब्ध करण्यासाठी खर्च केला आहे.मात्र त्यापैकी कोणत्याही कामाची ग्रामपंचायत सभेत मंजुरी घेण्यात आली नाही आणि त्यामुळे तो साडे सहा लाखाच्या निधीचा परतावा सरपंच यांच्याकडून करावा असे तक्रारदारांचे म्हणणे होते,त्याची चौकशी अहवालात नोंद घेण्यात आली आहे.


                सरपंच दीपिका आसवले यांचे पती भानुदास जंगले हे घाटकोपर येथे सरकारी नोकरी करीत आहेत,परंतु ते ग्रामपंचायत कार्यलयात बसून कारभार करीत असतात असा ग्रामपंचायत मधील सहा सदस्यांचा आरोप आहे.तर मागील वर्षात झालेल्या मासिक मीटिंग मध्ये सरपंच या बैठक सुरू असताना कानाला फोन लावून बैठकीमधील माहिती आपल्या पती यांना ऐकवत असतात.त्यात पती कडून सांगण्यात येत नाही,तोवर सरपंच बैठकीत काहीही उत्तर देत नाहीत किंवा शक्यतो बोलत नाहीत असा सदस्यांचा आरोप आहे.तर वार्षिक कामांचा पुरवठा करताना सरपंच आसवले आणि ग्रामविकास अधिकारी संतोष सराई यांनी साव एंटरप्राइज यांना साधारण साडे सहा लाखाचे बिल अदा केले आहे,पण ते साहित्य ग्रामपंचायत कार्यालयात आले आहे किंवा नाही याची कोणतीही नोंद ग्रामपंचायतकडे नाही हे चौकशी मध्ये सिद्ध झाले आहे. त्याशिवाय न्यू अंबिका लाईट, साईकृपा वॉटर सप्लायर,गिरिसेवा एंटरप्राइज,महेंद्र धुमाळ,अनंता खंडवी, योगेश नवले,किरण फोपे,मनोहर गोरे,महादू केवारी,निवृत्ती कडव,भारती चिमटे,सदानंद वाघमारे,डिजी वन इलेटेक्ट्रिक,जानकु हेमाडे,मनोहर मेगाळ,दिनकर कारोटे,कृष्णा कराळे,यांनी साधारण बारा लाखाचे साहित्य ग्रामपंचायतला दिले आणि त्यांची देयके त्या 34 जणांना देण्यात आली आहेत,पण त्यातील कोणत्याही वस्तू ग्रामपंचायत मध्ये पोहचल्या याची नोंद ग्रामपंचायत मध्ये नाही असे चौकशी मध्ये स्पष्ट झाले आहे.तसेच मोरया एंटरप्राइज, सदानंद वाघमारे,अशोक परशुराम जंगले,योगेश नवले यांनी 8 लाखाच्या वस्तूंचा पुरवठा केला आहे,पण त्या वस्तूंची नोंद देखील ग्रामपंचायत मध्ये नाही.हे सर्व करण्यासाठी सरपंच आसवले यांनी नियम बाह्य ग्रामसभा घेतल्या आहेत असा अन्य सदस्यांचा आरोप असून त्या सभांच्या आणि अन्य कोणत्याही सभांचे इतिवृत्त ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे उपलब्द नाही.


सुनील आयरे-विस्तार अधिकारी, कर्जत पंचायत समिती


वरिष्ठानी आपल्याला चौकशी अधिकारी नेमल्याने आपण कर्जत पंचायत समिती कार्यालयात तक्रारदार आणि सामनेवाले यांना बोलावून घेतले. तेथे प्रत्येक विषयावर ग्रामविकास अधिकारी यांनी आणलेले दफतर तपासून अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर केला आहे.त्या चौकशीच्या सरपंच,ग्रामविकास अधिकारी यांना आणि तक्रारदार यांना आणखी काही म्हणणे मांडायचे असल्यास लेखी द्यायची सूचना केली होती.मात्र चौकशी नंतर 20 दिवस कोणीही आपल्याकडे किंवा पंचायत समितीकडे लेखी म्हणणे मांडले नाही.


दीपिका आसवले-सरपंच


आम्हाला त्या चौकशीच्या वेळी अधिकारी आयरे यांनी बोलू दिले नाही.पण लेखी म्हणणे मांडण्याची सवलत दिली होती.


फोटो ओळ : गणेश पवार


नांदगाव ग्रामपंचायत मधील शाळेची इमारत