सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवउपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळातर्फे आयोजन 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


स्टार्टअप इनोव्हेशन सेलमधील सदस्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न पुणे, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० : 


नवउपक्रमांबद्दलची जाणीव होऊन सुरुवातीच्या टप्प्यावर स्टार्टअप्स तयार व्हावेत, हा महत्वाचा उद्देश समोर ठेवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'नवउपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ' (सेंटर फॉर इनोवेशन, इनक्यूबेशन अँड एंटरप्राईजेस) या विभागाने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप इनोव्हेशन सेलची स्थापना करण्यास मदत केली आहे. सध्या २७५ महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे स्टार्टअप इनोव्हेशन सेल कार्यरत आहेत. 


 ही संकल्पना नाविन्यपूर्ण असल्यामुळे स्टार्टअप इनोव्हेशन सेलचे प्रमुख आणि इतर सदस्यांना वेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज भासते. हीच गरज ओळखून 'नवउपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ' व आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (EDII) यांच्या संयुक्त विद्यमाने क्षमता बांधणीवरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २६ ऑक्टोबर २०२० ते ३० ऑक्टोबर २०२० दरम्यान करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. मिलिंद कांबळे यांच्या उपस्थितीत मा. कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. नवउपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर या कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक होत्या. विद्यापीठाच्या मानव संसाधन विकास केंद्र अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात विविध महाविद्यालयांमधील स्टार्टअप इनोव्हेशन सेलचे प्रमुख आणि इतर सदस्य अशा १०० जणांनी सहभाग नोंदवला. 


नवीन कौशल्यांचा वापर करून महाविद्यालयाशी निगडित नाविन्यपूर्ण सेवांचा शोध घेणे,याबाबत या कार्यक्रमामध्ये सहभागी सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे घोकंपट्टी बाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता महाविद्यालयांमध्ये तयार होण्यास मदत होणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान सहभागी प्राध्यापकांनी त्यांच्या महाविद्यालयांकरिता कृती योजना तयार केली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून ३००० ते ५००० संकल्पना पुढे येऊन त्यातील काहींचे रूपांतर स्टार्टअप मध्ये होऊ शकेल, अशी माहिती नवउपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली. 


या प्रशिक्षण कार्यक्रमात आयआयटी मद्रासचे चिफ इनोव्हेशन ऑफिसर शिवा सुब्रमणियम, आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे प्राध्यापक व अहमदाबाद येथील क्रेडल संस्थेचे संचालक डॉ. सत्य रंजन आचार्य, नॅशनल रिसर्च डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनचे प्रमुख आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फेलिसिटेशन सेंटर, भारत सरकारचे डॉ. बी. के. साहू, गुजरात टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन सेंटरचे संचालक हिरणमय मेहता अशा दिग्गज मंडळींनी मार्गदर्शन केले. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण, स्टार्टअप मधील व्यवसाय आणि शाश्वत स्वरूपातील स्टार्टअप इनोव्हेशन सेल कसे तयार करावे, या प्रमुख विषयांवर या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन केले गेले.  


---------------------------


अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे महाविद्यालयांमध्ये शाश्वत स्वरूपातील स्टार्टअप इनोव्हेशन सेलची स्थापना करण्यास मदत होईल. त्यामुळे स्टार्टअप इनोव्हेशन सेलमधील विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढून त्यांचा आत्मविश्वास वाढू शकेल. तसेच शिक्षकांमध्ये सकारात्मक बदल झाल्यास संपूर्ण शिक्षण पध्द्तीमध्ये चांगला बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे भविष्यात देखील अशा प्रकारच्या क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.   


- डॉ. अपूर्वा पालकर,


संचालिका,


नवउपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ,


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ   


-----------------


इनोव्हेशन स्टार्टअप सेल हा कसा असावा याबाबत आम्हाला यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. आंत्रप्रिनरशिप आणि इनोव्हेशन सेल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे या प्रशिक्षणामुळे समजले. विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे, हे जरी आपण शिकवत असू तरी इतरांपेक्षा वेगळा विचार कसा करावा हे सांगणारा हा सेल आहे. अत्यंत माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि खऱ्या अर्थाने क्षमता बांधणी म्हणजे काय हे आम्हाला या प्रशिक्षणातून समजले. 


- अर्चना जोशी, 


प्रमुख, स्टार्टअप इनोव्हेशन सेल


एम.ई.एस. गरवारे महाविद्यालय