पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सौम्य संपदेच्या जोरावर भारत अधिराज्य गाजवेल
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे मतः २५ व्या ऑनलाईन संतश्री ज्ञानेश्वर -तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफतांना
पुणे, दि. २६ नोव्हेंबर:“भारतीय संस्कृती, आध्यात्मिक लोकशाही, ज्ञानोपासना, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाशी असलेले नाते या सौम्य संपदेच्या (सॉफ्ट पॉवर) गुणांमुळे भारत हा संपूर्ण जगावार अधिराज्य गाजवू शकतो. या देशाने जगाला भगवान गौतम बुद्ध, महावीर, गुरूनानक, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी या सारखे महापुरूष दिले आहेत. त्यामुळे आपली सौम्प संपदा सांभळण्यासाठी आपले आचरण हेच महत्वाचे आहे.”असे मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्फ् २५ व्या ऑनलाईन तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी हरिद्वार येथील देव संस्कृती विश्वविद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ. चिन्मय पंड्या, सातारा येथील प्रेरक वक्ता प्रा.नितिन बालगुडे पाटील व जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सम्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ.मिलिंद पांडे, डॉ. आर.एम.चिटणीस, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, डॉ. अर्चना चौधरी, डॉ. प्रिती जोशी, डॉ, शुभलक्ष्मी जोशी आणि डॉ. सचिन गाडेकर हे उपस्थित होते.
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले,“ भारतीय जीवन पद्धतीमधील प्रत्येक अंग वैशिष्टपूर्ण आहे. अगदी, आध्यात्मिक लोकशाही पासून ते खाद्य संस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्टीचे कुतुहल पाश्चात्य देशांमध्ये आढळून येते. कोणत्याही बाबतीत भारतीय अशा सर्व गोष्टींचे आपले असे एक वेगळेपण आहे. येथील आयुर्वेद, संस्कृत भाषा, शिल्प कला, शास्त्रीय नृत्य, स्थापत्यकला या सर्व गोष्टींना हजारो वर्षांची परंपरा आहे. येथील प्रत्येक नागरिक समाधानाने व आशेने जगतांना दिसून येतो. ही गोष्ट पाश्चात्यांना फार महत्वाची वाटते. शिक्षक विद्यार्थी संबंधामध्ये जो जिवंतपणा व जिव्हाळा जपण्यात आला आहे, तो इतरत्र नाही. ”
“ सत्तेच्या जोरावर नव्हे तर संस्कृतीच्या जोरावर अग्नेय अशियातील नाट्यकला भारतीय परंपरेने भारलेली आहे. हीच गोष्ट युरोप, अमेरिकेमध्ये आपल्या खाद्य पदार्थांच्या बाबतीत सुद्धा अनुभवाला येते. पण आपल्याला जर याचे सामर्थ्य जाणवलेले असेल तर आपण आपल्या आचरणातून ते व्यक्त केले पाहिजे. तरच सर्व जगावर आपल्या सौम्य संपदेचा प्रभाव पडेल.”
डॉ, चिन्मय पंड्या म्हणाले,“ मणुष्य उपभोगाच्या मागे धावत सुटला आहे. कारण त्याला खर्या सुखाचा विसर पडला आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेहून परतले तेव्हा लोकांनी विचारल्यावरून ते म्हणाले मी जगभर फिरलो परंतू भारत देशाइतका चांगला ज्ञानपूर्ण देश मला जगाच्या पाठीवर आढळला नाही. आपल्या देशात अनेक महापुरूष होऊन गेले व त्यांनी ही भूमी पवित्र केली आहे. त्याचाच वारसा आपण आज चालवित आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. या देशामध्ये जी नितिमत्ता आढळून येते ती दुर्मिळ आहे. दुर्देवाने आपल्याला ही जाणीव नाही.”
“सर्व भौतिक संपत्ती सोडून जीवाला जावे लागते पण त्यांनी आत्मसात केलेला वारसा मात्र त्याच्या बरोबर येतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मानवामध्ये अप्रतिम ऊर्जा आहे. तो खाली पडला ता बुद्दू बनतो ,उठला तर बुदध बनतो. एकीकडे राम आहे तर दुसरी कडे रावण ही बनतो. यामुळे जीवन उंच उठविण्यासाठी सदैव प्रयत्न करावे. ”
“भारतीय संस्कृतीचे महत्वाचे केंद्र बिंदू म्हणजे मानवाच्या आतमध्ये जे उत्कृष्ट आहे त्याला बाहेर काढणे आहे. हेच काम या देशातील संतांनी केले. त्यांनी मानव जीवन उंच करण्याचा सदैव प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या संदेशावर चालत राहिल्यास जीवन सुखी व आनंदी होईल.”
प्रा. नितिन बानगुडे पाटील म्हणाले ,“ उद्याची पिढी समृद्ध करावयाची असेल तर इतिहास समजून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे उद्याचा इतिहास घडवायचा असेल तर पाठिमागच्या इतिहासाचा मागोवा घ्यावा लागेल. सृष्टीचा प्रवास हा वर्तुळाकार आहे. इतिहासाला वादाचा विषय होऊ देऊ नका तो कोणत्याही जाती जाती किंवा धर्मा धर्मासाठी नको तर तो वर्तमानकाळात मानवा मानवाचा उत्तम संवाद घडविण्यासाठी असावा. ”
“ शत्रूला सीमेवर अडविले पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सूत्र होतेे. त्याच सूत्राचे पालन आम्ही कोरोनाच्या वेळेस करून त्याला सीमेवर अडविले असते तर आज ऐवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झाला नसता. महाराजांच्या काळात सर्व गोष्टी या समृद्ध व प्रगत होती तसेच त्यावेळेसे चे ज्ञान ही समृद्ध होते. त्यामुळे त्याचा अभ्यास करने आवश्यक आहे. प्रत्येकाला जीवनात सुखी आणि समाधानी व्हायचे असेल तर संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेले सूत्र म्हणजे गरजा आणि जाणिवा आवाक्यात ठेवले पाहिजे. ”
डॉ. विजय भटकर म्हणाले “करोनाच्या पार्श्वभूमीवर जगात अशांततेच वातावरण निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार मानवाला तारू शकेल. तसेच, सौम्य संपदेच्या बरोबर माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हार्ड पॉवर निर्माण होऊ शकेल. मन व बुद्धिच्या जोरावर भारत चीनला जिंकू शकेल.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले “आसूरी संपत्तीचा नायनाट करून दैवी संपत्ती प्राप्त करण्याचा भारतीय जनतेचा प्रयत्न असतो. भारतीय संस्कृती, परंपरा व तत्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्याकडे पाहिले जाते. भारतामध्ये देह, बुद्धि, आत्मा आणि मन यांचे चिंतन केले जात आहे. विज्ञान आणि आध्यात्माच्या समन्वयातून भारत विश्वगुरू म्हणून उद्यास येईल.”
डॉ. मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.
महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शैलश्री हरिदास यांनी आभार मानले.