वनराई’च्या मोहन धारिया यांच्या आठवणींना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये उजाळा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे : स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे अण्णा, तडफदार राजस व्यक्तिमत्व तरीही सात्विक अंतरंग, समाजकारण, राजकारण आणि पर्यावरण या तीन भागातील जीवनाचा आलेख, इंदिरा गांधींच्या काळात नाकारलेले उपनेत्याचे पद, खेड्यांकडे परत चला हा दिलेला नारा, पर्यावरण संवर्धनाची पेटवलेली ज्योत, संत विद्यापीठासाठी घेतलेला पुढाकार, परदेशी लोकांना बोलवून सादर केलेली दिवाळी, रक्षाबंधन अश्या अनेक आठवणींना उजाळा देत 'वनराई'चे संस्थापक पदमविभूषण डॉ. मोहन धारिया यांना सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूतर्फे स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली.


डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे सुपुत्र आणि 'वनराई'चे अध्यक्ष रवींद्र धारिया, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात केली. प्रा. शेफाली जोशी यांनी धारिया यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. डॉ. शैलेश कासंडे यांनी राजकीय करकीर्दीवर प्रकाश टाकला. रवींद्र धारिया यांनी मनोगतात वनराई प्रकल्पाचे सध्याचे कार्य व सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या जडणघडणीत धारियांचा वाटा आणि संस्थेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. 'सुर्यदत्ता' भविष्यात हॉवर्ड विद्यापीठाप्रमाणे नावलौकीकास यावे, हे अण्णांचे स्वप्न होते आणि ते परिपूर्तीकडे जात असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला.


'सुर्यदत्ता'तर्फे दिल्या जाणाऱ्या सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने २००७ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले होते. दरवर्षी धारिया संस्थेत भेट द्यायचे. संस्थेच्या आवारात करण्यात आलेल्या वृक्षारोपणाला 'मोहनबाग' असे नाव देण्यात आले आहे. 'वनराई'च्या विविध गावांत राबवलेल्या भात लागवडीच्या उपक्रमात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे डॉ. कासंडे यांनी सांगितले.


"स्वातंत्र्यसैनिक, माजी केंद्रीय मंत्री डॉ. मोहन धारिया यांनी संसदेत व समाजात केलेले देशसेवेचे कार्य अतुलनीय आहे. पर्यावरण, शेतकरी वर्गासाठी त्यांनी महनीय काम केले. देहाने जरी आपल्यात नसले तरी त्यांची प्रेरणा आपल्यातच आहेत. धर्म, राजकारण, साहित्य या प्रत्येक क्षेत्रातील लोकांशी त्यांचा संपर्क होता. वनराईचे संपादक म्हणूनही त्यांनी अतिशय योग्य भूमिका घेऊन काम केले. धारिया यांना जीवनपट समाजकारण, राजकारण आणि पर्यावरण या तीन विभागांत विभागलेले आहे. कोणत्याही एका व्यक्तीला एका आयुष्यात अशा तीन पातळीवर जगणे कठीण आहे. मात्र, त्यांनाच ते शक्य झाले, असे रवींद्र धारिया यांनी सांगितले.


डॉ. धारिया यांचे व्यक्तिमत्त्व संतासारखे होते. पर्यावरण रक्षण, ग्रामविकासात त्यांनी वाहून घेतले. त्यांचे कार्य पुढे नेणे हीच खरी आदरांजली आहे. सध्या जागतिक तापमान वाढ हा ज्वलंत मुद्दा आहे त्यामूळे वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. 'वनराई'च्या सर्व उपक्रमात आमचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सक्रिय सहभाग घेऊन धारिया यांच्या कार्यास हातभार लावतील, असे संस्थेचे विश्वस्त सिद्धांत चोरडिया यांनी नमूद केले. याप्रसंगी 'सुर्यदत्ता'चे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल धनगर यांनी केले.