हॉटेल, बार, रेस्टॉरंट चालविताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे प्रवाह न्युज पोर्टल   पुणे दि.7 : हॉटेल, बार, रेस्टॉरंट चालविताना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.


 शासनाच्या आदेशान्वये 50 टक्के क्षमतेनुसार हॉटेल्स, फुड कोर्ट, रेस्टाँरट व बार हे 5 ऑक्टोबर पासून सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हयात हॉटेल, रेस्टॉरंट या आस्थापना चालू करण्यास दिनांक 5 ऑक्टोबर 2020 रोजी आदेश निर्गमित केलेले आहेत. महाराष्ट्र शासन व पर्यटन विभाग यांनी ज्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या सूचनेनुसार विशेषत: हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांच्याकडून या आदेशाची योग्य रितीने अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी साथ नियंत्रण कायदा, 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतुदींनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये पुढील प्रमाणे विहित मानक कार्यप्रणाली निर्गमित केली आहे.


  पुणे जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, फुड कोर्ट, रेस्टॉरंट व बार हे 5 ऑक्टोबर 2020 पासून 50 टक्के क्षमतेनुसार सूरु राहतील. या करीता पर्यंटन विभागाकडून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) चे पालन करणे बंधनकारक आहे. पुणे जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, फुड कोर्ट, रेस्टॉरंट व बार हे दि. 5 ऑक्टोबर पासून 50 टक्के क्षमतेनूसार सूरु राहतील. हॉटेलमध्ये येणा-या सर्व ग्राहकांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनिंग द्वारे तपासणी करण्यात यावी. तसेच आरोग्य सेतू ॲप, डाऊनलोड व अपडेटेड असणे आवश्यक आहे. कोविड-19 संदर्भात लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात यावा. ताप, सर्दी, खोकला या सारखी लक्षणे असलेल्या ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने प्रत्येक ग्राहक, ग्रूप मधील एकाचे नांव, संपर्क क्रमांक ई-मेल आयडी, दिनांक, वेळ इ. माहितीच्या नोंदी दररोज अद्ययावत ठेवण्यात याव्यात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची ना हरकत घेण्यात यावी. आस्थापनांनी सेवा देताना किंवा प्रतिक्षालय येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे पालन करावे. ग्राहकांनी मास्क परिधान केले असेल तरच त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात यावा. ग्राहकांनी हॉटेलमध्ये व हॉटेलच्या परिसरात असताना मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. (खानपाना व्यतिरिक्त) आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर प्रतिक्षा कक्ष, प्रवेशव्दार इत्यादी ठिकाणी उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. आस्थापना चालकांनी ग्राहकांना शक्यतो डिजीटल माध्यमाद्वारे पेमेंट करण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख स्वरुपात पेमेंट घेताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कॅशियर यांनी त्यांचे हात सतत निर्जंतूक करावेत. रेस्टरुम व हात धुण्याच्या जागा यांची वारंवार स्वच्छता करण्यात यावी व वारंवार वापर होणाऱ्या जागा निर्जंतुकीकरण कराव्यात. काऊंटर कॅशिंयर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लकसिग्लास स्क्रीन या सारखे बॅरीयर असावे. शक्यतो प्रवेशासाठी व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत. शक्यतो दारे, खिडक्या उघडी ठेवावीत व ए.सी.चा वापर टाळावा. ए.सी. वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शक्य असल्यास पोर्टेबल हाय एफिसियन्सी एयर क्लीनर बसवावेत. आस्थापनेच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असावी. सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे. आस्थापनेच्या ठिकाणी व्हॅलेट पार्किंग उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्हज यांचा वापर करणे अनिवार्य आहे. डिस्पोजेबल मेनू कार्ड, क्युआर कोड सारख्या माध्यमातून संपर्करहित मेनूकार्ड उपलब्ध करण्यात यावे. रीयुजेबल मेनू कार्ड ग्राहकांचे वापरानंतर निर्जंतुक करावे. डिस्पोजेबल मेनू कार्ड वापरानंतर त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. कापडी नॅपकीन ऐवजी चांगल्या प्रतीच्या डिस्पोजेबल पेपर नॅपकीनचा वापर करावा. आस्थापनांनी दोन टेबल मधील अंतर कमीत कमी 1 मीटर असेल या प्रमाणे त्यांचे रचनेमध्ये योग्य ते बदल करुन घ्यावेत. ग्राहकांच्या मागणीनुसार बाहय बाजू निर्जंतूक केलेली सीलबंद बाटलीतील पाणी अथवा फिल्टर केलेले पाणी ग्राहकांना उपलब्ध करुन दयावे. मेनु मध्ये फक्त शिजवविलेल्या खाद्य पदार्थांचा समावेश करावा शक्य असल्यास सलाड सारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत. प्रत्येक ग्राहकांच्या वापरानंतर ग्राहक सर्विस एरियाचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. फर्निचर, टेबल, खुर्च्या, बुफे, टेबल काऊंटर इ. जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. बुफे सेवेला परवानगी नाही. शक्यतो मेनु मध्ये प्री प्लेटेड डिशेशना प्रोत्साहन द्यावे. हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंटस आणि बार आस्थापना यांना एकुण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यासाठी परवानगी असेल. त्यासाठी पर्यटन विभागामार्फत स्वतंत्र मार्गदर्शक कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली आहे. मार्गदर्शक कार्यप्रणाली नुसार कामकाज चालु ठेवणे बंधनकारक राहिल. पुणे जिल्हयातील सर्व व्यक्तींना अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त इतर कामकाजासाठी घराबाहेर पडताना मुखपटटी वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे व वैयक्तिक स्वच्छते विषयीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असल्याने प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) विषयक संबंधीत प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गत केलेल्या आदेशातील सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल. सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आरोग्य सेतू प डाऊनलोड केल्याची खात्री करुन घ्यावी. परवाना कक्षामध्ये सोशल डिस्टसिंग राहिल, अशी बैठक व्यवस्था करावी तसेच परवाना कक्षाममध्ये बार काऊंटर, टेबल खुर्च्या, विविध उपकरणे उदा. शेकर्स, ब्लेंडर, मिक्सर आणि मदयाचे आकारमान मोजण्यासाठी पेग व अन्य साहित्य सातत्याने सॅनिटाईज करण्यात यावे. तसेच बर्फ ठेवण्याची उपकरणे (ट्रॉली,आईस बकेट इ.) वेळोवेळी स्वच्छ ठेवावीत. मदय, वाईन, बिअर इत्यादींच्या बाटल्या, ग्लास इ. फूड ग्रेड सॅनिटायझरने स्वच्छ करावेत. तसेच लिंबू आणि गरम पाण्याचा वापर करुन आवश्यतेनुसार स्वच्छ करावेत. केवळ नेमून दिलेले कर्मचारी यांनीच संबंधीत टेबलवर अन्न पदार्थ सर्व्ह करावे. प्लेटस, चमचे आदी सर्व सेवा उपकरणे गरम पाण्यात व मान्यताप्राप्त जंतूनाशकाने धुवावीत.सेवा उपकरणे, वस्तू, भांडी ही वेगवेगळी आणि सॅनिटाईज केलेल्या कपाटात ठेवावीत. शक्यतो सेवा उपकरणे व अन्न पदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वॉर्मस असावेत. ग्राहकांनी वापरलेली प्लेटस, चमचे, ग्लास इ.सेवा उपकरणे तातडीने स्वच्छ करण्यासाठी धुण्याच्या जागी न्यावीत. तसेच शिल्लक राहिलेले अन्न हे संबंधीत बकेट मध्ये जमा करावे तसेच दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याची दररोज विल्हेवाट लावण्यात यावी. ग्राहकांनी हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करावा. जेवणा व्यतिरिक्त मास्कचा वापर करावा. याबाबतची पोस्टर्स आस्थापनांचे प्रवेश व्दाराजवळ लावणेत यावीत. ऑनलाईन आउटलेट असणाऱ्या आस्थापनांनी आस्थापना सुरु असण्याच्या वेळा, मास्कचा वापर, खादय पदार्थांची आगाऊ बुकिंग, आगाऊ पेमेंट, डिलिवरी इ.बाबत असणारे नियम,पॉलिसी यांची माहिती वेबसाईट, सोशल मिडिया इ. माध्यमातून प्रसिध्द करावी. सर्व संबंधीत आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमित कोविड-19 चाचणी करावी. एन-95 किंवा त्याच दर्जाचा मास्क कर्मचाऱ्यांनी वापरणे अनिवार्य आहे. आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांनी त्यांचा गणवेष दररोज बदलणे अनिवार्य आहे. गणवेष व्यवस्थित सॅनिटाईज करावा. दिवसातून दोन वेळा आस्थापनेच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी आल्यावर थर्मल स्कॅनिंग करावे. तसेच कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षता, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वैयक्तिक स्वच्छता, खादय पदार्थ तयार करताना घ्यावयाची दक्षता, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इ.बाबत प्रशिक्षण दयावे. सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी स्वत: घ्यावी तसेच कोविड-19 संदर्भात काही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ कोविड-19 हेल्पलाईन वर वैदयकीय उपचाराकरीता संपर्क साधावा. आस्थापनांनी ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी शक्यतो जागेचे पुर्व आरक्षण करणेची व्यवस्था करावी. तसेच संपर्क क्रमांक प्रसिध्द करावा आणि पुर्व आरक्षणाव्दारे हजर होणाऱ्या ग्राहकांची प्राधान्याने व्यवस्था करावी. आस्थापनांनी ग्राहकांनी प्रतिक्षालयामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे अशा सूचना दर्शनी भागात देखील प्रसिध्द कराव्यात. आस्थापनांनी सामाजिक अंतर पाळण्याच्या दृष्टीने आवश्यक तेथे मार्किंग खुना करुन घ्याव्यात. आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी हॉटेल्स, फुड कोर्ट, रेस्टॉरंट व बार यांच्या क्षमतेनूसारच ग्राहकांना प्रवेश द्यावा. आस्थापनांनी किचन एरिया वारंवार सॅनिटाईज करण्यात यावा. तसेच किचनमध्ये काम करणारे कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी यांनी नेटकॅप, फेसशिल्ड अशा सूरक्षा साधनांचा वापर करणे अनिवार्य आहे. आस्थापनांनी एचएसीसीपी, आयएसओ, एफएसएसएआय यांचे स्वच्छता बाबतचे निकष व मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पणे पालन करावे. आस्थापनांनी त्याचेकडे जमा होणारा ओला, सुका, बायोडिग्रेडेबल इ. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे. ग्लोव्हज, मास्क इ. चे स्वतंत्रपणे व्यवस्थापन करावे. हॉटेल्स, फुड कोर्ट, रेस्टॉरंट व बार सुरु ठेवतांना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता पर्यटन विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात शासनाच्या आदेशातील अटी व शर्तींचे पालन न करणाऱ्या आस्थापना, व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे व शास्तीचे अधिकारी जिल्हाधिकारी यांचे अधिनस्त उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच त्यांनी नियुक्त केलेले अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहेत. शासनाने घालून दिलेल्या व या आदेशात नमूद असलेल्या विहित मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन केल्यास व त्यामुळे कोविड-19 संसर्ग वाढण्यास मदत होत असेल तर अशा हॉटेल, रेस्टॉरंट यांचा परवाना आवश्यक त्या कालावधीसाठी निलंबित करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी, तहसिलदार हे पारित करतील. पुणे ग्रामीण जिल्हयात शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याचे अधिकार या आदेशाव्दारे पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याला या आदेशाव्दारे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत. विहित मानक कार्यप्रणालीचा चा भंग करणाऱ्या आस्थापनेस प्रथमत: निदर्शनास आल्यास, दंडाची रक्कम रु. 2 हजार 500 असेल, व्दितीय भंगावेळी दंडाची रक्कम रु. 5 हजार असेल, तर तिसऱ्यांदा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास रक्कम रु. 7 हजार 500 दंड आकारण्यात यावा. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाव्दारे बारची तपासणी करताना, महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 व त्या अंतर्गत असणाऱ्या नियमांचे तसेच उपरोक्त विहित मानक प्रणालीचे उल्लंघन झाल्यास या बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचेकडे सादर करुन त्याबाबत प्रथम नियमभंगाबाबत रु. 10 हजार, व्दितीय भंगाबाबत रु. 25 हजार व तिसऱ्यांदा उपरोक्त अधिनियम व नियमावलीअंतर्गत भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास रक्कम रु. 50 हजार दंड आकारण्यात येईल. तसेच वारंवार नियमभंग करणाऱ्या बारचा परवाना निलंबित अथवा कायमस्वरुपी रद्द करणेबाबतही कडक कारवाई करण्यात येईल. तसेच परवाना कक्षाबाबत उपरोक्त विहित मानक कार्य प्रणालीचे उल्लंघन झाल्यास कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने करावयाची असून दंडात्मक आदेशासाठी जिल्हाधिकारी यांना प्रकरण सादर करावयाचे आहे. 


या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता 1860 अन्वये सर्व संबंधित दंडनिय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी आदेशीत केले आहे. 


00000