वातानुकूलित बसकडे प्रवाशांची पाठ ; ‘एन.एम.एम.टी.’च्या उत्पन्नात निम्म्याने घट.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल  नवी मुंबई : टाळेबंदीत बंद असलेली नवी मुंबई परिवहन सेवा पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी चांगली आर्थिक उत्पन्न देणारी वातानुकूलित बस सेवेकडे मात्र प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. दिवसाला तीनशे प्रवासी कमी झाल्याने उत्पन्नही निम्म्याने घटले आहे. टाळेबंदीपूर्वी या सेवेतून मिळणारे साडेसहा लाखांचे उत्पन्न आता फक्त ३ लाख ७८ हजारांपर्यंत मिळत आहे. नवी मुंबई पालिकेची परिवहन सेवा तोटय़ात असून पालिकेच्या उत्पन्नावर सुरू आहे. दरम्यान करोना प्रादुर्भावानंतर टाळेबंदीत ही बससेवाही बंद असल्याने परिवहनचे उत्पन्न ठप्प झाले होते. त्यानंतर शिथिलीकरणानंतर हळूहळू ही बससेवा सुरू झाली असून लोकल बंद असल्याने प्रवासी बस प्रवासाला प्राधान्य देत आहेत. 


एन.एम.एम.टी.च्या ४८० बसपैकी ३२५ बस सध्या धावत आहेत. टाळेबंदीच्या आधी प्रतिमहिना ‘एन.एम.एम.टी.’चे एकंदरीत उत्पन्न ११.५० कोटी होते ते आता ५.८० कोटींवर आले आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमाची आर्थिक परिस्थिती अजूनच नाजूक झाली आहे. त्यात वातानुकूलित बससेवेकडे मात्र प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. थंड वातावरणात करोनाचा विषाणू अधिक काळ राहात असल्याने प्रवासी या बसने प्रवास टाळत आहेत. टाळेबंदीपूर्वी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता. बांद्रा, बोरीवली या भागांत मोठय़ा प्रमाणात वातानुकूलित बस धावत होत्या. पालिका परिवहन उपक्रमाकडे एकूण ४८० बस असून त्यातील ११५ बस या वातानुकूलित आहेत. टाळेबंदीच्या पूर्वी ११५ पैकी सरासरी १०० बस धावत होत्या. त्यातून परिवहनला चांगले उत्पन्नही मिळत होते. परंतु टाळेबंदीनंतर या बसचे प्रवासी घटले आहे. परिणामी परिवहन उपक्रमाने या बसच्या फेऱ्या कमी केल्या आहेत.