पुणे प्रवाह न्युज पोर्टल
भाईंदर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोकाट श्वानांच्या वाढत्या दुर्घटनेला आळा घालण्यासाठी श्वानांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे घालण्याचा उपक्रम मीरा रोड येथील प्राणिप्रेमी वर्गाकडून राबवण्यात आला आहे. यामध्ये मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्या गळ्यात हे पट्टे लावले जात आहेत.
काशिमीरा येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठय़ा प्रमाणात मोकाट श्वान आहेत. अनेक वेळा वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या खाली येऊन श्वानांच्या दुर्घटना होत असतात. त्यामुळे जागतिक श्वान दिनाचे औचित्य साधून प्राणिप्रेमी सचिन अनिल जांभळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन काशिमीरा परिसरातील चाळीसपेक्षा अधिक भटक्या श्वानांना रेडियम असणारे पट्टे घालण्याचा उपक्रम राबवला. वाहनचालकांना काळोखात ठळकपणे श्वान दिसून आले की काही प्रमाणात अपघातांना आळा बसू शकतो असे प्राणिप्रेमींनी सांगितले. तसेच शहरातील श्वान निर्बीजीकरण व श्वानांना अँटी रेबीजची लस देण्याची प्रक्रिया मोठय़ा प्रमाणात राबविण्यासाठी आणि प्राण्यांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेला निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.