पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कल्याण : नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि त्यानंतरच्या काळात चांगली बाजारपेठ मिळत असल्याने मुरबाड, शहापूर परिसरांतील अनेक शेतकरी झेंडूच्या फुलांची शेती करू लागले. जूनमध्ये लागवड केलेला झेंडू आता बहरावर आला आहे. मात्र करोनामुळे अनेक उत्सवांवर पाणी फिरले असल्याने झेंडूला बाजारभाव मिळत नसल्याचे दिसून आले आहे. गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांना दरवर्षीप्रमाणे मागणी नव्हती. त्यामुळे शेतक ऱ्यांना आता नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीची आस लागली आहे. सण-उत्सवात आणि इतर धार्मिक विधींसाठी झेंडूच्या फुलांचा वापर होत असल्याने मुरबाड, शहापूर परिसरांतील अनेक शेतकरी भात लागवड, भाजीपाल्याच्या जोडीला जोडधंदा म्हणून झेंडूच्या शेतीकडे वळले आहेत. हमखास नफा मिळवून देणारी हे पीक असल्यामुळे गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्ह्य़ात झेंडूची शेती बहरू लागली. शहापूर, मुरबाड तालुक्यांमधील शेतकरी कल्याणमधील बाजारात येऊन फुलांची घाऊक, किरकोळ पद्धतीने विक्री करून नफा पदरात पाडून घेतात. सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनास्थळांमधील वावर यांवर या शेतीचे गणित अवलंबून असते. दिवाळीपर्यंत करोनाची साथ नियंत्रणात येईल, असा विचार करून शेतक ऱ्यांनी जूनमध्ये झेंडूची लागवड केली. मात्र करोनाचा अद्याप झेंडूला चांगला बाजारभाव मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरवर्षी दीड ते दोन एकर माळरान जमिनीवर झेंडूची लागवड करतो. पाऊस कमी झाला की फुले मुरबाड, कल्याणच्या बाजारात विकली जातात. नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे चांगला दर मिळून केलेली मेहनत लाभदायी ठरते.