आय.पी.एल. क्रिकेट ऑनलाईन बेटींग/सट्टा खेळणा-या व खेळविणा-या आरोपीत यांच्याविरूध्द स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांची धडाकेबाज कारवाई

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


        ------------------  


                    सध्या भारतातील अत्यंत लोकप्रिय क्रिडा स्पर्धा असणारी ‘इंडियन प्रिमीयर लिग’ ही क्रिकेट स्पर्धा दुबई, शारजा व अबुधाबी या ठिकाणी सुरू आहे. जगभरातील क्रिकेट प्रेमींचे अमाप मनोरंजन करणारी ही आय.पी.एल स्पर्धा कधी सुरू होते याबाबत जशी उत्सूकता असते तेवढीच उत्सुकता या स्पर्धेच्या दरम्यान सट्टा खेळणा-या बुकींना देखील असते.


                  19 सप्टेंबर, 2020 रोजी ‘इंडियन प्रिमीअर लिग-2020’ ला सुरूवात झाली. स्पर्धेवरुन बेटींग/सट्टा लावणा-यावर विशेष लक्ष केंद्रीत करून अशा काही हालचाली आढळून आले होते. त्वरीत कायदेशिर कारवाई करण्याकरिता जे.ए.शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड यांना सूचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे गोपनिय बातमीदार यांना सतर्क केले होते. प्राप्त गोपनिय माहितीच्या आधारे दिनांक 01/10/2020 रोजी रात्रौ 22.20 वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जे.ए.शेख, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मौजे खांडपे ता.कर्जत येथील हॉटेल 007 युनिव्हर्स रिसाँर्टच्या रूम नंबर 120 मध्ये छापा टाकला.त्या ठिकाणी आरोपीत कांती करमसीभाई वारसुंगीया, वय-43, रा. कोपरी, ठाणे, प्रकाश पोपट पुजारी, वय-42, रा. मुलूंड, मुंबई असे दोघेजण आय.पी.एल. मधील किंग्ज ईलेव्हन, पंजाब व मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये सुरू असणा-या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळतांना मिळून आले.त्यांच्या ताब्यातून सट्टा खेळण्यासाठी वापरत असलेले एकूण 05 मोबाईल फोन्स, कॅल्क्यूलेटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. 


                     त्यांच्याकडे अधिक तपास केला असता सदरचे आरोपीत हे वेगवेगळया मोबाईल फोन्सच्या माध्यमातून वेगवेगळया मोबाईल अप्स व आय.डी. यांच्या मदतीने आय.पी.एल. क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळत असल्याचे यावेळी आढळून आले.नमूद दोन्ही आरोपीत यांच्याकडून एकूण 20 मोबाईल आय.डी.यांची माहिती मिळून आलेली असून या 20 मोबाईल आय.डी.पैकी एकूण 04 मोबाईल आय.डी. या आरोपीत यांनी सट्टा खेळण्याकरिता वापरल्या असल्याची माहिती तपासा दरम्यान मिळून आलेली आहे. या मोबाईल फोनमध्ये आढळून आलेले सिमकार्ड ही नमूद आरोपीत यांनी इतर कोणातरी इसमांच्या नावांवर नोंदणीकृत करून घेतलेली असल्याचेही त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने कर्जत पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.नं. 176/2020, भा.द.वि.सं.क. 420, 465, 468, 471, 34 सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 4 (अ), 5 तसेच इंडियन टेलिग्राफ अॅक्ट 1985 चे कलम 25 (क) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास श्री.जे.ए.शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हे करीत आहेत.


                  आरोपीत यांच्या गुन्हयाच्या कार्यपध्दती बाबत माहिती घेतली असता असे आढळून येते कि, यातील आरोपीत हे सर्व प्रथम सट्टा घेणा-या बुकी तसेच त्यांच्या मध्यस्थांशी संपर्क करतात. सदरचे बुकी तसेच त्यांचे मध्यस्थ हे एक विशिष्ठ मास्टरकार्ड धारण करतात. सट्टा खेळणा-या इसमांनी त्यांच्याकडे त्यांना सट्टा खेळावयाच्या रक्कमेचा भरणा केल्यानंतर तेवढया रक्कमे इतके त्यांना संबंधित बुकी/मध्यस्थ यांच्यामार्फत पाँइंटस् दिले जातात. रक्कम भरणा केल्यानंतर त्या मास्टरकार्डच्या मदतीने सट्टा खेळणा-या इसमांना एक आय.डी. व त्याचा पासवर्ड व्हाँटस्अप किंवा टेक्स्ट मॅसेजद्वारे पाठविण्यात येतो. त्या पासवर्डच्या मदतीने आय.डी. कार्यरत होते व आय.डी.च्या माध्यमातून संबंधित बुकींकडे ऑनलाईन सट्टा खेळविण्यात येतो. सट्टा खेळणा-या व्यक्तीच्या आय.डी.च्या खात्यामध्ये असणा-या पाँइंटस प्रमाणे आर्थिक फायदा/तोटा यांचा हिशोब करण्यात येतो व त्याप्रमाणे प्रत्येक आठवडयाच्या प्रत्येक सोमवारी जिंकल्या/हरल्याचा व फायदा/तोटयाचा हिशोब करण्यात येतो व आर्थिक देवाण-घेवाण करण्यात येते. अशाप्रकारे ऑनलाईन सट्टा खेळविण्यात येतो.सदर गुन्हयाच्या पुढील तपासामध्ये वेगवेगळया बुकी व त्यांच्या मध्यस्थ अशा एकूण 11 आरोपीत यांना आतापर्यन्त अटक pकरण्यात आलेली आहे. त्या सर्वांची मा.न्यायालयातून दिनांक 11/10/2020 रोजीपर्यन्त पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे. सदर गुन्हयाच्या आतापर्यन्त केलेल्या तपासामध्ये एकूण 05 आरोपीत फरारी असून त्यापैकी काही महत्वाचे बुकी आरोपीत हे गुजरात, बेंगलोर व दुबई येथे असल्याची माहिती तपासामध्ये मिळून येत असून सदरचे महत्वाचे बुकी असणारे आरोपीत इसम हे गुजरात, बेंगलोर व दुबई येथून सदरचे सट्टा रॅकेट चालवित असल्याची माहिती तपासामध्ये निष्पन्न झाली आहे. फरारी असणा-या बुकी आरोपीतांच्या शोधार्थ खास तपास पथकांची नियुक्ती करण्यात आलेली असून ही पथके गुजरात व बेंगलोर या ठिकाणी रवाना करण्यात आलेली आहेत. गोपनियतेच्या कारणास्तव पाहीजे असणा-या आरोपीतांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत.


                   सदर गुन्हयाच्या आतापावेतो करण्यात आलेल्या तपासामध्ये ऑनलाईन सट्टा खेळण्याकरिता व खेळविण्याकरिता अटक आरोपीत वापरत असलेले एकूण 16 मोबाईल फोन्स जप्त करण्यात आलेले आहेत. सदरची कारवाई ही मावळते पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक जे एन शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स.पो.नि. संदीप पोमण, पो.उ.नि.सचिन निकाळजे, पो.उ.नि.अभिजीत देशमुख यांनी ही कारवाई केली.