पुणे प्रवाह न्युज पोर्टल
फळ पीक विमा योजना आंबिया बहारा.. शेतक-यांना सहभागी होण्याचे आवाहन
पुणे :- पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2020-21 मध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, काजू, स्ट्रॉबेरी (प्रायोगिक तत्त्वावर) या 8 फळ पिकासाठी 30 जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोके निकषानुसार राबविण्यात येत आहे, या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे अपेक्षित आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना आंबिया बहार सन 2020-21 या हंगामा करिता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येणार आहे.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने / भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरिक्त विमा संरक्षण देण्यात येते, त्यासाठी अतिरीक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे.जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. ही योजना सन 2020-21आंबिया बहार मध्ये 5 जिल्हा समुहांसाठी विमा कंपन्यांमार्फत राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा समुह निहाय जिल्ह्याची नावे व कंपनीची नावे पुढीलप्रमाणे आहेत-
अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर - एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कं. लि. पहिला मजला, एचडीएफसी हाऊस, 165-166 बॅकबे रिक्लॅमेशन, एच.टी. पारेख मार्ग, चर्चगेट, मुंबई-400020 ग्राहक सेवा क्र. : 022 - 62346234, दूरध्वनी क्र. 022- 66383600 ई-मेल:- shailesh.thakur@hdfcergo.com, shekhar.kapale@hdfcergo.com.
बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार - भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्चेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट मुंबई – 400023 टोल फ्री क्र. : 1800116515, दूरध्वनीक्र. 022 – 61710912 ई-मेल- mhwbcis@aicofindia.com
रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद- बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कं. लि. बजाज अलायन्झ हाऊस, एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे – 411006 टोल फ्री क्र. : 1800 209 5858, दूरध्वनी क्र. 020 - 6602 6666
ई-मेल:- pramod.patil01@bajajallianz.co.in, anupam.shrey@bajajallianz.co.i
आंबिया बहार सन 2020-21 मध्ये फळपिक निहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत पुढील प्रमाणे आहे. शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था /बँक/आपले सरकार सेवा केंद्र/ विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे/ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे आहे. द्राक्ष- 15 ऑक्टोबर 2020, मोसंबी व केळी- 31 ऑक्टोबर 2020, संत्रा, काजू, आंबा (कोकण)- 30 नोव्हेंबर 2020, आंबा (इतर जिल्हे), डाळिंब - 31 डिसेंबर 2020, स्ट्रॉबेरी- 14 ऑक्टोबर 2020
आंबिया बहार सन 2020-21 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निर्धारित करण्यात आला असून निर्धारीत केलेले हवामान धोके (Trigger)लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होणार आहे.
द्राक्ष या फळपिका करीता योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2020 असून स्ट्रॉबेरी या फळपिका करीता 14 ऑक्टोबर 2020 अशी आहे. त्या दृष्टीने प्राधान्याने या दोन फळपिकांसाठी नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल सुरु करण्यात आले आहे. इतर अधिसुचित फळ पिकांसाठीही संकेतस्थळ या आठवड्याभरात कार्यान्वीत करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागा मार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावयाचा आहे. आंबिया बहारातील अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ - www.krishi.maharashtra.gov.in पाहता येईल. तसेच ई - सेवा केंद्र व बँक स्तरावरही याबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सुचना कृषी विभागाने सहभागी विमा कंपन्यांना दिल्या आहेत.
000000
वृषाली पाटील,
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय,पुणे