बेस्टचा विद्युत विभागही तोटय़ात...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


.


मुंबई : बेस्ट उपक्रमाने शनिवारी सादर केलेल्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्प अंदाजात यापूर्वी फायद्यात असलेल्या विद्युत विभागाला तोटा झाल्याचे, तर परिवहन विभागातील तूट कमी झाल्याचे समोर आले आहे. परिवहन आणि विद्युत विभागाचा मिळून १,८८७ कोटी ८३ लाख रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प अंदाज बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी शनिवारी सादर केला. विद्युत विभागाला यंदा प्रथमच २६३ कोटी ५९ लाख रुपये तोटा झाला आहे. तर परिवहन विभागाचा तोटा काहीसा कमी झाला आहे. करोनाकाळात बसलेला आर्थिक फटका, मुंबई पालिकेने अनुदानात केलेली कपात यामुळे आर्थिक गर्तेत असलेली बेस्ट फायद्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. बेस्टच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात एकूण २,२४९ कोटी ७४ लाख रुपयांचा तोटा दाखविला होता. तुलना केल्यास यंदाच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात तूट कमी झाल्याचे दिसून येते. परंतु गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात विद्युत विभाग ९९ कोटी रुपयांनी फायद्यात होता. यंदा हा विभागही तोटय़ात असल्याने बेस्टसमोर मोठी चिंता आहे. तर परिवहन विभागाचा २ हजार ३४९ कोटी रुपये असलेला तोटा, यावेळी १ हजार ६२४ कोटी २४ लाख रुपयांपर्यंत दाखवण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे म्हणाले की, वीज दर तेवढेच असून यंदा वीज विक्रीही झालेली नाही. त्याचा परिणाम महसुली उत्पन्नावर झाला असून विद्युत विभागाला तोटा झाला आहे. याशिवाय परिवहनची तूट कमी करण्यासाठी खर्च कपातीचे धोरण अवलंबयात आले. त्याचा फायदा बेस्टला अधिक झाला. यात स्वमालकीऐवजी भाडेतत्वावर बस घेणे, नवीन भरती प्रक्रिया बंद करणे इत्यादींमुळे तूट कमी झाली आहे. उत्पन्न : ३,५३२ कोटी ३० लाख रुपये खर्च : ३,७९५ कोटी ८९ लाख रुपये .