गरब्याविना लॉन, मंगल कार्यालये सुनी ;लॉन, मंगल कार्यालय चालक संकटात....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



गरब्याविना लॉन, मंगल कार्यालये सुनी ;लॉन, मंगल कार्यालय चालक संकटात........


 पुणे : दरवर्षी नवरात्रोत्सवात शहरातील लॉन, मंगल कार्यालयात रंगणारा गरबा यंदा पाहायला मिळणार नाही. करोनाच्या संसर्गामुळे शहरातील लॉन, मंगल कार्यालये गेली सात महिने बंद आहेत. अद्याप लॉन, मंगल कार्यालये सुरू करण्यास परवानगी न मिळाल्याने लॉन चालकांसह मंगल कार्यालय चालकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शहरात चाळीस ते पन्नास लॉन आहेत. मंगल कार्यालयांची संख्या तीनशे ते चारशेंच्या आसपास आहे. शहरातील लॉन आणि मंगल कार्यालय चालकांची संघटना देखील नाही. गेले सात महिने शहरातील लॉन, मंगल कार्यालये बंद आहेत. देखभाल, दुरुस्ती खर्च, वीज, कामगारांचे पगार, पाणीपट्टी असे खर्च शहरातील लॉन आणि मंगल कार्यालय चालकांना करावे लागत आहेत. येत्या काही दिवसांत लॉन आणि मंगल कार्यालये सुरू न झाल्यास ती बंद करावी लागतील. त्यामुळे शासनाने लॉन आणि मंगल कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालविण्यास परवानगी द्यावी, असे बिबवेवाडीतील यश लॉनचे श्रीपाल ओस्तवाल यांनी सांगितले. विवाह समारंभ, वाढदिवस तसेच अन्य कार्यक्रमांना परवानगी नाही. मात्र, वीजबिल, महापालिका कर, कामगारांचे पगार आम्हाला करावेच लागत आहेत. हे खर्च भागविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. शासनाने ५० नागरिकांच्या कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. मात्र, मोजक्याच उपस्थितीमुळे मंगल कार्यालये, लॉनमध्ये आयोजित केले जाणारे समारंभ तसेच अन्य कार्यक्रमांसाठी कोणी आगाऊ नोंदणी (बुकिंग) करत नाहीत.  शासनाने किमान २०० ते २५० नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली तर किमान लॉन, मंगल कार्यालये सुरू होतील. त्यातून खर्चही भागविणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. लग्नसराई, नवरात्रोत्सवात व्यवसाय नाही गेले सात महिने लॉन, मंगल कार्यालये बंद आहेत.