ठाणे परिवहन करोनाच्या विळख्यात; आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू,  तर १३० जण बाधित.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल ठाणे : करोना टाळेबंदीच्या काळातही नागरिकांना सेवा पुरविणाऱ्या ठाणे महापालिकेची परिवहन सेवा करोनाच्या विळख्यात सापडली आहे. आतापर्यंत १३९ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर काही प्रमाणात शासकीय आणि खासगी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे या उपनगरांतून मोठय़ा संख्येने नागरिक रेल्वेने मुंबईकडे नोकरीनिमित्त जात असतात. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी रेल्वे सेवा बंद असल्याने ठाणे आणि कल्याण परिवहन सेवेच्या बसगाडय़ा मुंबईकडे सोडण्यात आल्या आहेत. गाडय़ांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांची बस स्थानकांवर मोठी गर्दी होत असते. ठाणे, मुंबईकडे या करोनाकाळात ठाणे परिवहनच्या १२२ गाडय़ा धावत आहेत. ठाणे परिवहन सेवेतील करोनाची बाधा झालेल्या १३० जणांपैकी ८३ जण करोनामुक्त झाले आहेत, तर ४७ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती ठाणे परिवहन विभागातून देण्यात आली. त्यामुळे वाढत असलेल्या या करोनाच्या प्रादुर्भावामुळे कर्मचारी चालक आणि वाहक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.