सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे लोक-कला केंद्र, टेक महिंद्रा फाउंडेशन आणि उर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पुणे, दिनांक २५ ऑक्टोबर २०२० : 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्राच्या वतीने व पुण्याच्या टेक महिंद्रा फाउंडेशन आणि उर्मी या सेवाभावी संस्थेतर्फे पुणे परिसरातील लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेल्या सहा महिन्यापासून कोविड - १९ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या संचारबंदीमुळे लोककलांच्या सादरीकरणाचे सर्व कार्यक्रम बंद असल्यामुळे त्यामुळे आपल्या कलांच्या सादरीकरणावर अवलंबून असलेल्या लोककलावंतांचे जीवन हालाखीचे झालेले होते, त्यामुळे लोककलावंतांना मदतीची नितांत आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर शनिवार दि. २४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ४. ०० या वेळात विद्यापीठातील अंगण मंच येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते पुणे परिसरातील लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 


महाराष्ट्रातील विविध लोककला या सर्व प्रयोगकलांच्या मुळाशी असल्याने लोककलावंत जगला, तर इतर सर्व प्रयोग कला जगातील, म्हणून हा उपक्रम आवश्यक होता असे उद्गार मा. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी यावेळी काढले. पुणे परिसरातील अजून अशा गरजू लोककलावंतांचा शोध घेऊन हा उपक्रम पुन्हा राबविला जाईल असे प्रवीण भोळे म्हणाले. या वेळी एकूण २०० लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी टेक महिंद्रा फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती कल्पना दिवाडकर, लोककला केंद्राचे संचालक डॉ. प्रवीण भोळे आणि उर्मी पुणेचे राहुल शेंडे उपस्थित होते.