सक्रिय बाधितांची संख्या आठ हजाराहून कमी ;३० मृत्यू ; ६५८ नवे बाधित, ८९४ करोनामुक्त....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल  नागपूर :  शहरी व ग्रामीण भागात २४ तासांत ३० करोनाबाधितांचे मृत्यू तर ६५८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, शहरात नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या अधिक होती. त्यामुळे जिल्ह्य़ातील सक्रिय बाधितांची संख्या अनेक दिवसानंतर आठ हजाराहून कमी नोंदवली गेली आहे. जिल्ह्य़ात दिवसभरात नोंदवलेल्या ६५८ एकूण रुग्णांतील ५२९ रुग्ण शहर, ११८ रुग्ण ग्रामीण तर ११ रुग्ण जिल्ह्य़ाबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ६८ हजार ५५२, ग्रामीण १८ हजार १८७, जिल्ह्य़ाबाहेरील ४९१ अशी एकूण ८७ हजार २३० वर पोहचली आहे, तर दिवसभरात नोंदवलेल्या ३० मृत्यूंमध्ये शहरातील ११, ग्रामीणचे ८, जिल्ह्य़ाबाहेरील ११ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या २ हजार १२, ग्रामीण ४९९, जिल्ह्य़ाबाहेरील ३०९ अशी एकूण २ हजार ८२० वर पोहचली आहे. दरम्यान, गेल्या वीस ते पंचवीस दिवसांत एखादा दिवस वगळल्यास इतर दिवशी करोनामुक्तांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या कमी आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ८७२ वर आली आहे. त्यात शहरातील ५ हजार १२९, ग्रामीणचे २ हजार ७४३ जणांचा समावेश आहे. चाचण्यांची संख्या पुन्हा पाच हजाराखाली येथील शहरी भागात दिवसभरात ४ हजार ४७० तर ग्रामीणला केवळ ४६१ अशा एकूण ४ हजार ९३१ आर.टी.पी.सी.आर. आणि रॅपिड अँटिजन अशा दोन्ही चाचण्या झाल्या. शासनाकडून चाचण्या वाढवण्याची सूचना असताना उलट शहरात चाचण्या कमी होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर आरोग्य विभागाकडून मात्र चाचण्यांसाठी नागरिकच पुढे येत नसल्याचा दावा केला जात आहे.