एक चांगले पुस्तक माणसाचे आयुष्य बदलू शकते - डॉ. पंडित विद्यासागर 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


              पुणे :- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी .जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहिःशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष आणि कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथील बहिःशाल शिक्षण मंडळ, मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या वतीने डॉ ए. पी .जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले.  


प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. पंडित विद्यासागर मार्गदर्शन करताना म्हणाले, 'एक चांगले पुस्तक माणसाचे आयुष्य बदलवू शकते. विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने पुस्तक वाचण्याचा संकल्प केला पाहिजे. ग्रामीण व शहरी असा कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता वाचन करून समृद्ध झाले पाहिजे. वाचन संस्कृती हीच प्रमुख संस्कृती झाली पाहिजे'.  


सदर कार्यक्रमात त्यांनी वाचनाचे महत्व विशद केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. ते म्हणाले , ' आजच्या तरुणाईवर संस्कार करण्यासाठी वाचनाची अत्यंत आवश्यकता आहे.' त्यांनी आपल्या मनोगतात अनेक साहित्यिकांच्या कामगिरीचा आढावा घेतला. उदघाटनपर भाषणात बहिःशाल शिक्षण मंडळाचे मानद संचालक डॉ. धनंजय लोखंडे म्हणाले, ' विद्यार्थ्यांनी महापुरुषांची चरित्रे, शास्त्रज्ञांच्या व यशस्वी व्यक्तींच्या जीवनप्रवासाची आत्मचरित्रे वाचावीत व तसे अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा.' पुढे त्यांनी बहिःशाल शिक्षण मंडळाचा आढावा घेऊन ज्ञानसंक्रमण करणे, अशी बहिःशाल शिक्षण मंडळाची लोकाभिमुख भूमिका विशद केली.


         या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन डॉ. राजाराम गावडे व आभार प्रदर्शन डॉ. गजानन ढोबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनात ग्रंथपाल प्रा. मनीषा गायकवाड यांनी सहकार्य केले.