नवरात्रीनिमित्त नऊ रंगांच्या मुखपट्टय़ा ;ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील विविध बाजारपेठांमध्ये दाखल ;  खरेदी करण्याकडे महिलांचा कल....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



 ठाणे/ डोंबिवली : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवावरही करोनाचे सावट असल्यामुळे यंदा या उत्सवानिमित्त होणारा गरब्याचा कार्यक्रम मंडळांनी रद्द करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी या उत्सवाच्या काळात नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याबरोबर नऊ रंगांच्या मुखपट्टय़ा खरेदी करण्याकडे महिलांचा कल असल्याचे चित्र आहे. दरवर्षी नवरात्रीनिमित्त बाजारात महिलांसाठी जॅकेट विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. यंदा या जॅकेटबरोबरच त्याला शोभेल अशा मुखपट्टय़ाही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. करोना महामारीमुळे गेल्या काही महिन्यांत सण-उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. तर, अनेक मंडळांनी यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवही रद्द केले होते. करोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवावरही करोनाचे सावट कायम आहे. त्यामुळे काही मंडळांनी यंदाचा नवरात्रोत्सव रद्द करण्याबरोबरच त्यानिमित्ताने होणारा गरब्याचा कार्यक्रम रद्द केला आहे, तर काही मंडळे अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करणार आहेत. त्याचा परिणाम बाजारपेठांवर होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र नवरंगी मुखपट्टय़ा दाखल झाल्याने बाजाराला चालना मिळाली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात महिला नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान करतात आणि त्यामध्ये काहीतरी नव्या ट्रेंडचा समावेश असतो. यंदा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुखपट्टी वापरणे बंधनकारक करण्यात आल्याने महिलांचा आता कपडय़ांप्रमाणेच नऊ रंगांच्या मुखपट्टय़ा वापरण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे.