विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात येणार*      -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत


उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा


पुणे,दि. 6: पुणे विद्यापिठा अंतर्गत एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापिठाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र - कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, अधिसभा सदस्य अमित पाटील, परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे आदी उपस्थित होते.


 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, पुणे विद्यापिठा अंतर्गत एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक अडचण येणार नाही, याबाबतची सर्व दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच 113 सेंटरवर ऑफलाईन परीक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणीही कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्यात येईल. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत परीक्षाचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.


 पुणे विद्यापिठाने अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबत केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त करून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, विद्यापिठ व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय रहावा, यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच 8 ऑक्टोबरपासून सराव प्रश्नसंच देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आले आहे. परीक्षाबाबत प्रत्येक जिल्हयाला नोडल अधिकारी म्हणून प्राचार्याची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी परीक्षा पासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.