कोल्हापूर महापालिकेची सभा तहकूब करण्याला राजकीय वळण , संभाजीराजेंची नाराजी....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


कोल्हापूर महापालिकेची सभा तहकूब करण्याला राजकीय वळण ,


 संभाजीराजेंची नाराजी....


कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची सभा तहकूब करण्यावरून राजकीय वळण लागले. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचा निषेध करून सभा तहकूब करावी, अशी सूचना विरोधी भा.ज.पा. – ताराराणी आघाडीने दोन दिवसापूर्वी दिल्यावर सत्तारूढ काँग्रेस आघाडीने काल सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले. तरीही आज अचानकपणे महापौर निलोफर आजरेकर यांनी सभागृहात येवून मोदींनी संभाजीराजे छत्रपती यांची भेट नाकारल्याने केंद्र सरकारचा निषेध करून सभा तहकूब करीत असल्याचे जाहीर केले. महापौरांच्या या भूमिकेचा निषेध भा.ज.पा. ताराराणी आघाडीने केला. याबाबत विरोधी पक्ष नेता विजय सूर्यवंशी, गटनेते सत्यजित कदम, गटनेते अजित ठाणेकर यांनी सांगितले की, सभा तहकूब केल्याचे जाहीर करून अचानकपणे सभागृहात येवून भा.ज.पा, ताराराणीची सभा तहकूब करण्याची सूचना न वाचता केंद्र सरकारचा निषेध करणे हा प्रकार सभागृहाच्या पवित्र्यास गालबोट लावणारा आहे. भा.जकपाकने आणि महाविकास आघाडीने मराठा आरक्षणासाठी काय केले यासाठी जाहीर चर्चेस तयार आहोत , असे आव्हानही त्यांनी दिले. 


हे तर राजकारण – संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो. परंतु मला मोदींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांवर नाराज आहे, अशा आशयाचे पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महापौर, पदाधिकारी व सर्व नगरसेवक यांना पाठवले आहे. करोनाचा कोल्हापुरात प्रकोप वाढला आहे. त्यासंदर्भातील उपाय योजना महासभेतकेल्या असत्या तर योग्य झाले असते. पण तुम्ही ही महासभा माझ्या आणि मोदींच्या भेटीच्या संदर्भाला चुकीच्या पद्धतीने घेतले, असे म्हणत त्यांनी नाराजी दर्शवली.