मुळशी पॅटर्न’ च्या ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाण्याने ओलांडला ५० मिलियन व्हुजचा टप्पा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल               प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित, अभिनित आणि अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी व पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. निर्मित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. या चित्रपटातील अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ या गाण्याने आपली घौडदौड कायम राखत नुकताच ५० मिलियन व्हूजचा टप्पा पार केला. चित्रपट प्रदर्शित होऊन दीड वर्षे उलटून गेले, तरीही प्रेक्षकांच्या मनात या गाण्याने घर केल्याचे दिसते.


           आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम सॉंगची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे, त्यामुळे या गाण्यास खास भाई स्टाईल डान्स बघायला मिळतो. प्रविण विठ्ठल तरडे हे या गाण्यापूर्वी लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित होते, पण या भाईटम सॉंगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा डान्स संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाला. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे तर आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे. गीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिले आहे. या गाण्याने सोशल मिडीया, संगीत वाहिन्या आणि विविध म्युझिक अॅप्सवर ट्रेंड करत गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला. आजही अनेक वाढदिवसाच्या पार्टीत हे गाणे हमखास लावतात तसेच विविध डान्स स्पर्धामध्ये लहान मुले यावर थिरकताना दिसतात.


https://www.youtube.com/watch?v=F4_La1CbFv0