महिला शासकीय रुग्णालयाकडून ‘गुड न्यू

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


दि. १० सप्टेंबर २०२०


 


*‘कोरोना’ काळातही बारामतीकरांना मिळाली*


 *महिला शासकीय रुग्णालयाकडून ‘गुड न्यूज’*


_*‘कोविड’ पॉझिटीव्ह महिलेची सुखरुप प्रसुती; आई व बाळाची प्रकृती ठणठणीत*_


            बारामती, दि. १० : ‘कोराना’संसर्गाच्या वाढत्या प्रसारामुळे सर्वत्र चिंतेचे मळभ दाटले असताना, बारामती येथील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात काल एक ‘गुड न्यूज’ ऐकावयास मिळाली. शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल झालेली एक गर्भवती महिला ‘कोविड’ पॉझिटीव्ह असल्याने त्या खासगी रुग्णालयाने तीची प्रसुती करण्यास असमर्थता दाखवली. त्यामूळे तिला बारामती येथील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करुन घेण्यात आले. बारामती वैद्यकीय महाविद्यायलय आणि महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी जोखीम घेत व आव्हान स्विकारीत या कोविड पॉझिटिव्ह गर्भवती महिलेली सुखरुप प्रसुती करुन बारामतीकरांना आगळीवेगळी ‘गुड न्यूज’ दिली. बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी कर्तव्याला जागत, सामाजिक जाणीवेतून केलेल्या कृतीनं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे प्रसुतीनंतर आई व बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. यामुळे बारामती महिला ग्रामीण रुग्णालयाच्या लौकीकात आणखी भर पडली आहे.    


             बारामती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ. त्यांच्या विशेष प्रयत्नातून सन २०१५ साली बारामतीमध्ये महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय सुरु झाले. या महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयाची कामगिरी सुरुवातीपासून दमदार राहिली आहे. गेल्या साडेपाच वर्षाच्या कालावधीत साडे पंधरा हजाराहून अधिक महिलांच्या प्रसुती रुग्णालयात झाल्या आहेत. त्यापैकी जवळपास १० हजार महिलांच्या प्रसुती नॉर्मल झाल्या आहेत. या साडेपाच वर्षाच्या काळात दीड लाखांहून अधिक महिलांनी या रुग्णालयात उपचार घेतले आहेत. एप्रिल ते ऑगस्ट २०२० या ‘कोरोना’ काळात १ हजार ७६७ प्रसुती या रुग्णालयात झाल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात उच्चांकी ४३१ सुखरुप प्रसुती झाल्या आहेत. बारामती तालुक्यासह दौंड, इंदापूर, फलटण, माळशिरज, पुरंदर तालुक्यातून महिला रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येत असतात. सर्व सुविधा मोफत असल्याने या रुग्णालयाचा सामान्य जनतेला मोठा आधार आहे. विश्वासाने आणि आपुलकीने सेवा देणारे शासकीय महिला ग्रामीण रुग्णालय म्हणजे गर्भवती महिलांसाठी दुसरे माहेरच बनले आहे. 


            सध्या ‘कोराना’च्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. या कठीण काळात दोन दिवसापूर्वी फलटण जि. सातारा येथील एका गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी बारामती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या गर्भवती महिलेला ‘कोविड’ची लक्षणे दिसत असल्याने तिची ‘कोविड’ टेस्ट करण्यात आली. यामध्ये गर्भवती महिला पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. याच दरम्यान काल गर्भवती महिलेला अचानक प्रसुतीच्या कळा सुरु झाल्या. मात्र ती ‘कोविड’ पॉझिटीव्ह असल्याने खासगी रुग्णालयाने तिची प्रसुती करण्यास असमर्थता दर्शवली. तिला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. 


त्या महिलेच्या वाढत्या प्रसुतीकळा आणि आरोग्याची स्थिती पाहता एवढ्या दूरचा प्रवास तिच्या आणि होणाऱ्या बाळाच्या जीवासाठी धोक्याचा होता. ही गंभीर परिस्थिती ओळखून महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि बारामती वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सर्व खबरदारी घेत तिची प्रसुती बारामतीच्या महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात करण्याचा साहसी निर्णय घेतला. त्यासाठी तातडीने स्वतंत्र ऑपरेशन थिएटरची व्यवस्था करण्यात आली. पीपीई किट चढवून सर्व खबरदारी घेत त्या ‘कोविड’ पॉझिटीव्ह महिलेची प्रसुती सुखरुप केली. या महिलेने तीन किलो वजनाच्या गुटगुटीत बाळाला जन्म दिला. सध्या आई व बाळाची प्रकृती ठणठणीत असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. 


           ‘कोविड’ पॉझिटीव्ह महिलेची यशस्वी प्रसुती करुन महिला शासकीय रुग्णालयाने आपल्या लौकीकात भर टाकली आहे, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यायाची उपयुक्तता सिध्द झाली आहे. ही गुंतागुंतीची प्रसुती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापू भोई यांच्या नेतृत्वाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष जळक, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सचिन तोरवे, भूलतज्ज्ञ डॉ. सुरज जाधवर, महिला परिचारीका अमरजा मार्डिकर यांनी यशस्वी केली आहे. या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 


*****