माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार होण्यास मदत  मुख्यमंत्री........

पुणे प्रवाह न्युज पोर्टल मुंबई : माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्राचे निर्माण करणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या मोहिमेची राज्यभर अमलबजावणी सुरु झाली असून स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्य विषयक माहितीचे संकलन करत आहेत. लोकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत, यामध्ये कोरोना बाधित, बरे झालेले रुग्ण, त्यांची पोस्ट कोविड स्थिती याबाबत माहिती घेत आहेत. लोकांना असलेल्या इतर आजारांची, त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची माहिती घेत आहेत.  आज त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोकण आणि पुणे विभागाचा कोरोना विषयक आढावा घेतला तेव्हा ते बोलत होते. अनलॉक प्रक्रियेमध्ये आता दळवणवळण आणि नियमित व्यवहार सुरु झाले असल्याने करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे हे लक्षात घेऊन मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करायला हवे, त्यादृष्टीने लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, मोहिमेत राज्यातील जनतेला मोठ्याप्रमाणात सहभागी करून घेऊन मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. कोकण विभागात १ कोटी ९२ लाख ७२ हजार ०६५ लोकसंख्या असून, ४८ लाख ६६ हजार ३७२ कुटुंब संख्या आहे. यासाठी ७ हजार ४२५ पथकांची आवश्यता आहे. त्यापैकी ६ हजार ७२१ पथके नेमण्यात आलेलीआहेत. दररोज २ लाख १७ हजार ५९४ कुटुंबांना भेटी दिल्या आहेत.आज अखेर ही संख्या १० लाख ६४ हजार १४३ एवढी होते.