शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे शेखर गायकवाड

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


यांचे मत; ऊस तंत्रज्ञानावर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशनतर्फे चर्चासत्र


 


पुणे : "महाराष्ट्रात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये वैविध्यपूर्ण उत्पादने घेण्याचा प्रयत्न झाला, तर शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो. साखर उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान येत असून, तंत्रज्ञानाचा वापर वाढला, तर आपले शाश्वत शेतीचे उद्दिष्ट्य साध्य होईल. साखर व ऊस उत्पादक या दोघांनीही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे आहे," असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.


     टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशन (टीटीए), वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (डब्ल्यूआयएसएमए-विस्मा) आणि डेक्कन शुगर टेक्नलॉजीस्ट असोसिएशन (डीएसटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने 'शुगरकेन टेक्नॉलॉजी'वर (ऊस तंत्रज्ञान) आयोजित चर्चासत्रात 'ऊसाच्या पिकाचे नियोजन करण्यात खेतीबडी तंत्राचा वापर' विषयावर गायकवाड बोलत होते. प्रसंगी 'टीटीए'चे यशवंत घारपुरे, विलास रबडे, 'विस्मा'चे सचिव अजित चौगुले, 'खेतीबडी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय नायर, मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. रिचा पवार-नायर, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्रीनिवासा रेड्डी आदी उपस्थित होते. ऋषिकेश शिंदे यांनी समन्वयन केले. यामध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी आपले प्रश्न विचारून शंकानिरसन केले.  


    शेखर गायकवाड म्हणाले, "कारखाने आणि शेतकऱ्यांच्या संवादासाठी व्हिडीओ तंत्रज्ञान वापरावे. 'खेतीबडी' या नवतंत्रज्ञानाचा चांगला वापर करून घ्यावा. त्यासाठी त्यांनी कारखान्याशी करार करावेत. शेतकऱ्यांनी नियोजन करून ठरलेल्या कारखान्यांना योग्य वेळेत ऊस दिला, तर उत्पादन चांगले होऊ शकते. कारखान्यांवरील गाड्यांची गर्दी, शेतकऱ्यांना उशिरा मिळणारे पैसे यावर नवीन तंत्रज्ञान शोधून तो लाभ तात्काळ कसा देता येईल, यावरही या क्षेत्रातील तंत्रज्ञ उपाय शोधत आहेत. 'डीएसटीए'मध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञ काम करत असून, त्यांनी पुढील ५० वर्षांच्या ऊसशेतीचे नियोजन केले तर फायद्याचे ठरेल. या दोघांमध्ये समतोल साधण्याची जबाबदारी साखर आयुक्तालयावर आहे."


      डॉ. रिचा नायर यांनी कारखानदार आणि शेतकरी यांना साखर उद्योगाचे तांत्रिकीकरण करून जास्तीत जास्त लाभ कसा होईल, याबाबत चर्चा केली. उसाचे उत्पादन, त्यात तंत्रज्ञानाचा वापर याविषयी त्यांनी सादरीकरणाच्या साहाय्याने उपयुक्त मार्गदर्शन केले. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांची नोंदणी, पिकाची माहिती, ऊस वाढीसाठी उपाय, पिकाचे वेळापत्रक, कृषी तज्ज्ञांशी संवाद, हवामान अंदाज, सल्ला व मार्गदर्शन, नवीन योजना आदी गोष्टी 'खेतीबडी' या ऍपवर उपलब्ध असल्याचे विनय नायर यांनी सांगितले. यशवंत घारपुरे म्हणाले, "तंत्रज्ञानाचा वापर वाढवला तर शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुप्पट होईल, पण त्याबरोबरच खर्च कमी केला तर तेच उत्पन्न तिप्पट होईल." अजित चौगुले यांनीही मार्गदर्शन केले. विलास रबडे यांनी प्रास्ताविक केले.