नाटय़ स्पर्धेतील कलाकार पारितोषिकापासून वंचित; राज्य सरकारच्या दोन विभागातील विसंवादाचा फटका......

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


नाटय़ स्पर्धेतील कलाकार पारितोषिकापासून वंचित;


राज्य सरकारच्या दोन विभागातील विसंवादाचा फटका......


 पुणे : सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि वित्त विभाग या शासनाच्या दोन विभागात समन्वय नसल्याचा फटका कलाकारांना बसला आहे. राज्य नाटय़ स्पर्धेत सादर झालेल्या नाटकांच्या सादरीकरणाचा खर्च, कलाकारांचा प्रवास भत्ता आणि पारितोषिकाची रक्कम ही दहा महिन्यांनंतरही कलाकारांच्या हाती पडलेली नाही. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पाठपुरावा करूनही वित्त विभागाकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे हा निधी अडकून पडला आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी राज्य नाटय़ स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत मराठी, हिंदूी, संस्कृत भाषेतील नाटकांसह संगीत नाटक आणि बालनाटय़ स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांतील कलाकारांना सादरीकरणासह प्रवास आणि भोजन भत्ता दिला जातो. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्य नाटय़ स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत नाटकांच्या सादरीकरणाचे पैसे सहभागी संस्थांना अद्याप मिळाले नाहीत. कोणतेही नाटक उभे करताना एका संघाला किमान ५० हजार रुपये ते एक लाख रुपये खर्च येतो. राज्य नाटय़ स्पर्धेत कोणत्याही संघाला एक नाटक सादर करण्यासाठी तीन हजार रुपयांची अनामत भरावी लागते. ही अनामत रक्कम राज्य नाटय़ स्पर्धेच्या आयोजकांनी सर्व संघांना परत केली आहे. मात्र, पारितोषिकांची रक्कम, नाटकाच्या सादरीकरणाचा खर्च, कलाकारांचा प्रवास आणि भोजन भत्ता ही रक्कम अद्याप मिळालेली नाही.