धनगर समाजाच्या जीवावर खासदारकी लाटणाऱ्या डॉ.विकास महात्मे यांना धनगरांचीच ऍलर्जी-दत्ता वाकसे*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



*मुंबई(गुरुनाथ भोईर):* धनगर समाजाच्या मतांचे राजकारण करून भाजपकडून खासदारकी मिळविणाऱ्या डॉ.विकास महात्मे यांना धनगर समाजाच्या हिताशी कसलेही देणेघेणे नाही.त्यांना धनगरांची ऍलर्जी आहे अशी खरमरीत टीका धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाध्यक्ष दत्ता वाकसे यांनी केली आहे.


याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,एसटी आरक्षण प्रश्नी भाजपवर नाराज झालेल्या धनगर समाजाची नाराजी दूर करण्यासाठी डॉ.विकास महात्मे यांना राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली. त्यानंतर महात्मेंनीसमाजाकडे ढुंकूनही बघितले नाही. राज्यसभेसारखे महत्त्वाचे विचारपीठ मिळून ही एस.टी. आरक्षण व इतर प्रश्न ऐरणीवर आणले नाहीत. महाराष्ट्रात रोज कुठे ना कुठे मेंढपाळांवर हल्ले होत आहेत.याबाबत डॉ.महात्मे यांनी कधीच आवाज उठवला नाही.त्यामुळे विकास महात्मे यांना मिळालेली खासदारकी धनगर समाजासाठी वांझोटी ठरली आहे.किंबहुना त्यांना धनगरांच्या हिताशी कसलेही देणेघेणे नाही,हे वेळोवेळी सिद्ध होत आहे.फेसबुकवर भाजप नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापलीकडे महात्मे यांचे खासदार म्हणून कर्तुत्व शून्य आहे.सरकार दरबारी भांडून समाजाला हक्क मिळवून देण्याचे तर दूरच उलट त्यांच्या हाती असलेला अधिकारही डॉ.महात्मे धनगर समाजासाठी वापरत नाहीत. याचे ताजे उदाहरण द्यायचे झाले तर खासदार कोट्यातून केंद्रीय विद्यालयामध्ये मिळणाऱ्या प्रवेशाचे देता येईल.खासदार आपल्या कोट्यातून दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देऊ शकतात.परंतू,येथेही विकास महात्मे यांना धनगर विद्यार्थी चालत नाही.त्यांच्या कोट्यातून ते फक्त शुक्ला, गुप्ता,सोनी,महात्मे अशा उच्चभ्रू लोकांच्या मुलांना प्रवेश मिळवून देतात.धनगर विद्यार्थ्याचे नाव लिहिताना त्यांची लेखणी का थरथरते याचे उत्तर अद्याप समाजाला मिळालेले नाही.धनगरांची एवढी ऍलर्जी असेल तर त्यांना धनगर समाजाच्या मतांचे राजकारण करण्याचा आणि भोळ्या भाबड्या धनगरांना भाजपच्या दावणीला बांधण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही.असेही धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.