कल्याण-डोंबिवलीत घरकामगारांची उपासमार; प्रशासकीय परवानगी असतानाही सहकारी गृहसंस्थांचा विरोध......

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


कल्याण-डोंबिवलीत घरकामगारांची उपासमार;


प्रशासकीय परवानगी असतानाही सहकारी गृहसंस्थांचा विरोध......


 डोंबिवली : कल्याण, डोंबिवली शहरांतील अनेक गृहनिर्माण सोसायटय़ा अजूनही घरकाम करणाऱ्या महिलांना वसाहतींमध्ये प्रवेश देत नसल्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गृहनिर्माण संस्थांनी करोनाच्या नावाने कोणालाही सोसायटीत येण्यापासून रोखू नये, घरकाम करणाऱ्या महिलांना अटकाव करु नये, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 


पोलीस, उपनिबंधक कार्यालयाने अशा सोसायटी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे शासनाचे आदेश आहेत. तरीही अनेक सोसायटी पदाधिकारी घरकाम करणाऱ्या महिलांना प्रवेश देण्यास विरोध करताना दिसत आहेत, अशी माहिती डोंबिवलीतील महिला बचत गटाच्या पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यां मनीषा राणे यांनी दिली. अनेक घरांमध्ये वृद्ध पती-पत्नी, ज्येष्ठ नागरिक आहेत. या मंडळींची मुले नोकरीनिमित्त परदेशात किंवा बाहेरच्या राज्यांत आहेत. अशा कुटुंबाना घरकामासाठी मदतनीसाची गरज आहे. काही घरांमध्ये बिछान्याला खिळून असलेले रुग्ण आहेत. त्यांची शुश्रूषा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मागील सहा महिन्यांच्या काळात अशा रुग्णांची सर्व देखभाल कुटुंबीयांनी केली. आता घरकाम करणाऱ्या कामगारांची आवश्यकता आहे. सोसायटी पदाधिकाऱ्यांना सांगूनही काही सोसायटी पदाधिकारी घरकामगारांना सोसायटीत प्रवेश देण्यास इच्छुक नाहीत, अशा तक्रारी पुढे येत आहेत. मार्चमध्ये टाळेबंदी लागू झाल्यानंतर सुरुवातीचे दोन ते तीन महिने काम नसताना अनेक कुटुंबांनी घरकामगारांना किराणा सामान, त्यांचे मासिक वेतन दिले. त्यानंतर मात्र अनेक कुटुंबीयांनी आम्ही गरज असेल तेव्हा कळवू, असे सांगून वेतन देणे थांबविले आहे, अशी प्रतिक्रिया काही घरकाम करणार्या कर्मचार्यांनी सांगितले.