पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे – ‘गणपती बाप्पा मोरया..., पुढच्या वर्षी लवकर’ च्या जयघोषात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ‘श्रीं’चे विसर्जन मंगळवारी दुपारी ३ वा. मंडपात साध्या पद्धतीने कृत्रिम हौदात करण्यात आले. ट्रस्टच्या १२९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही मिरवणुकी शिवाय गणारायांना निरोप देण्यात आला आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन येथे संपन्न झालेल्या या विसर्जन सोहळ्याला महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त (झोन १ ) स्वप्ना गोरे, महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर, विश्वस्त मिलिंद सातव, सुरज रेणुसे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरवर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन रात्रीच्या वेळी करण्यात येते, मिरवणूक पारंपारिक बैलगाडी मधून मोठ्या दिमाखात काढण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस व महापालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाने गणपती बाप्पाचे विसर्जन कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीशिवाय, शासकीय नियमांचे पालन करत मंडपातच मान्यवरांच्या उपस्थितीत केले.