*मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणा-यांवर वेळीच कारवाई करा* -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


ग्रामीण भागातील कोरोना उपाययोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला लोकप्रतिनिधींशी संवाद■ जम्बो रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना निश्चितच दिलासा


■ ग्रामीण भागात प्लाझ्मादानबाबत व्यापक जनजागृती करावी


■ कोरोनासोबतच पावसाळयाच्या कालावधीतील आजाराबात अधीक दक्षता घ्या


        पुणे, दि.28: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. परंतू, गत काही दिवसात जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छता, मास्कचा वापर व सुरक्षित आंतर व शासनाच्या निमयमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. मास्क न वापरणारे, सुरक्षित आंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणा-यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. अशी कारवाई सतत व नियमितपणे करावी. कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. 


                  ‘कोविड-१९’ विषाणू उपाययोजनाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. निलम गोऱ्हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीत सहभागी झाल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


  उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरात उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल. कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना करताना ग्रामीण भागात समन्वयासाठी स्वतंत्रपणे अधिका-यांची नेमणूक करावी, कोरोना प्रतिबंध उपाययोजना व इतरही योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. सर्वांशी समन्वय ठेवून कार्यवाही होणे अपेक्षित आहे जेणेकरून उपाययोजनेची परिणामकारता वाढेल,असे त्यांनी सांगितले.


कोरोनासोबतच पावसाळयाच्या कालावधीतील आजाराबात अधीक दक्षता घेण्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वाचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले. ग्रामीण भागात प्लाझ्मादानबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, तसेच प्लाझ्मादानसाठी स्वतंत्रपणे ॲप तयार करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.


     राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णालयातील आवश्यक सोई सुविधांची वाढ करावी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता असावी, कोरोना प्रतिबंधासोबतच उपचाराच्या सुविधांबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या.


  यावेळी खासदार सुप्रिया सुळे व खासदार खासदार श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री दिलीप मोहिते, सुनिल शेळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.


             विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात आलेले जम्बो रुग्णालयांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णाला प्राधान्याने उपचार देण्यात येतील, उपचारापासून कोणताही रुग्ण वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले.


              जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती दिली.


             यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 


००००००